समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शहाजी राजेंची भेट :
अलीकडे तंजावर मठात उपलब्ध झालेल्या कागदपत्रावरून एक गोष्ट सिद्ध झाली आहे की तपश्चर्येच्या काळात शेवटी शेवटी समर्थांची भेट छत्रपती शहाजी राजे यांचेशी झाली होती. एवढेच नव्हे तर त्या दोघांमध्ये हिंदवी स्वराज्याच्या निर्मितीबद्दल चर्चादेखील झाली होती. इतिहासाचार्य राजवाडे यांनी हि कागदपत्रे अभ्यासली असून त्यानुसार पुढील गोष्टी ध्यानात येतात -
इ.स. १६२८ पासून इ.स. १६३२ पर्यंत नाशिकपासून जुन्नर - संगमनेर पर्यंतचा भाग शहाजी महाराजांच्या अखत्यारीत होता. पावसाळ्यात अनेकदा त्यांच्या सैन्याचा ताल नाशिकमध्ये असायचा. दौलताबादला सुलतानाने जिजाबाईच्या माहेरची चार माणसे कापून काढल्याने शहाजी महाराज नाराज होते. याच काळात जिजाबाईना दिवस गेले होते. पुण्यात राहून शहाजी महाराजांनी आपले स्वत:चे राज्य निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न केला होता; परंतु बाळाराव या मराठा सरदारच्या मदतीने शहाजी राजांचा हा डाव आदिलशहाने उधळून लावला होता. शहाजी राजे आदिलशाही सोडून निजामांच्या चाकरीत आले. पण तिथेही असेच कटू अनुभव वाट्याला आले. या बाबतीत इ.स. १६३१ सालची एक भयंकर घटना बोलकी आहे.
शहाजी राजांना एक चुलत भाऊ होता. त्याचे नाव खेलोजी राजे भोसले. तोदेखील निजामशाहीतच नोकरीला होता. त्याची पत्नी सत्यभामा गोदास्नानासाठी नाशिकला येणार होती. त्या काळी राजघराण्यातील एखादी स्त्री गोदावरी नदीवर स्नानासाठी येणार असल्यास त्या परिसरात पुरुषांना प्रवेश मिळत नसे. त्या स्त्रीला कपडे बदलण्यासाठी कापडी पडद्यांचा आडोसा तयार केला जात असे. इ.स. १६३१ साली सत्यभामाबाई स्नानासाठी गोदावरी नदीवर आल्या. त्यांचे स्नान झाले. त्यांनी कपडे बदलले आणि रामकुंडावर त्या दर्शनासाठी निघाल्या. तेवढ्यात घोड्यांच्या टापांचा आवाज झाला. माणसे सैरावैरा धावू लागली. महाबतखान हा निजामातला सरदार भोसले घराण्याचा द्वेष करत होता. असहाय्यपणे धावणाऱ्याबाईना उचलून त्याने घोड्यावर घेतले आणि पळून गेला. या ठिकाणी एक गोष्ट विचार करण्यासारखी आहे की, शहाजी महाराजांसारख्या पराक्रमी सरदाराच्या भावजयीची हि कथा असेल तर सामान्य स्त्रियांच्या व्यथेला कोण वाली असणार ? सत्यभामेच्या आहार्नाची वार्ता कळल्यावर शहाजी महाराज तातडीने नाशिकला आले. सुमारे २ लाख रुपये भरून त्यांनी आपल्या भावजयीची सुटका केली. हे सर्व प्रकरण हाताळण्याच्या निमित्ताने ते दोन महिने नाशिक शहरात होते. त्या वेळी जिजाबाई शिवनेरी किल्ल्यावर चिमुकल्या शिवाजीबरोबर राहत होत्या. शिवाजी त्या वेळेस सुमारे दिड वर्षांचा होता. नाशकातील वास्तव्यात समर्थांची कीर्ती शहाजी महाराजांच्या कानावर निश्चित गेली असणार. त्यांचे नाशिकमधील उपाध्याय ढेरगेशास्त्री यांची आणि समर्थांचीदेखील भेट आणि परिचय यापूर्वीच झाला असेल. दुपारी १२ च्या सुमारास समर्थ गुहेतून बाहेर पडतात आणि भिक्षेसाठी पंचवटीत येतात हि माहिती शहाजीमहाराजांना मिळाली असणार. त्यानुसार एक दिवस ते दुपारी समर्थांना भेटायला आल्याची नोंद आहे. त्या डोहांमध्ये नेमकी कोणती चर्चा झाली याचा तपशील उपलब्ध नसला तरी समर्थ रामदास स्वामी आणि शहाजी महाराज या दोघांच्या मनात तत्कालीन देशस्थितीचे जे वादळ होते ते लक्षात घेता त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली असेल याचा आपण अंदाज करू शकते. या भेटीनंतर काही महिन्यांतच आपले पुरश्चरण संपवून समर्थ भारतभ्रमणाला निघाले आणि भारतभ्रमण संपल्यावर ते नेमके शिवाजी महाराजांच्या जहागिरीत येऊन स्थिरावले.
या घटनेवरून त्यांची आणि शहाजी महाराजांची काय चर्चा झाली असेल ते स्पष्ट ध्यानात येते. इतिहासाचार्य राजवाड्यांच्या मते तंजावरच्या भोसले रुमालातील बदंक तीन नुसार एक दिवस शहाजीराजे जिजाबाई आणि बाल शिवाजी यांना घेऊन समर्थांच्या दर्शनाला आले होते. शिवनेरी किल्ला नाशिकपासून अत्यंत जवळ आहे. त्यामुळे शहाजीमहाराज जिजाबाईनां घेऊन आले असतील हे अगदी स्वाभाविक आहे. माझ्या तर मनात येते कि दीड वर्षांच्या शिवबाने समर्थांनी कडेवर घेण्यासाठी हात पुढे करताच मोठ्या आनदाने झेप घेतली असेल आणि समर्थांच्या मांडीवर बसलेल्या शिवबाला पुन्हा जिजाबाईच्या स्वाधीन करणे शहाजी महाराजांना कठीण गेले असेल. चिमुकल्या शिवबाने आपल्या मुठीत समर्थांच्या गळ्यातले रामदासी वस्त्र घटत धरून ठेवले असेल अन तो समर्थांना चांगलाच बिलगला असेल.
तत्कालीन यवनांच्या अत्याचाराने भोसले आणि जाधव ही दोन्ही घराणी पोळलेली आहेत. सत्यभामेच्या घटनेनंतर शहाजी महाराजांनी निजामशाही सोडली; परंतु ते पुन्हा आदिलशाहीत गेले. काळही अनुकूल नव्हता. अशा वेळी शहाजी महाराजांनी आपण आदिलशाही एकनिष्ठ असल्याचे नाटक करायचे आणि जिजाबाईनी बाल शिवाजीला स्वतंत्ररीत्या घडवून त्याच्याकडून स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण करावयाचे. समर्थांनी जागोजागी मठ स्थापन करून त्या मठातल्या संघटनेने शिवाजी महाराजांना त्यांच्या कार्यात गुपचूप मदत करायची अशा प्रकारचा काही निर्णय शहाजीराजे आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीत ठरला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. एरवी भारतभर भ्रमण करणारे समर्थ रामदास स्वामी नेमके महाराष्ट्रातच का स्थिर व्हावेत ? शिवाजी महाराजांच्या जहागीरीतील चाफळ हेच केंद्र त्यांनी आपल्या हालचालींसाठी का निवडावे ?
दासबोध लेखनासाठी त्यांनी चंद्रराव मोरेंच्या वाड्याजवळची शिवथरघळच का निवडावी ? जीवनाची सायंकाळ त्यांनी शिवाजी महाराजांच्या मालकीच्या सज्जनगडावर का व्यतीत करावी ? आणि समर्थांच्या महासमाधी-नंतर त्यांचे सज्जनगडावरील समाधी मंदिर शिवरायांचे सुपुत्र धर्मवीर संभाजी यांनीच का बांधावे ? शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या भोसले घराण्यातील तीन पिढ्यांचा समर्थांशी आलेला संबंध हा केवळ कागदोपत्री पुरावा नाही म्हणून दुर्लक्ष करण्यासारखा नाही. ई.स. १६४५ साली शिवछत्रपतींनी पुण्यात हिंदवी स्वराज्याच्या कार्याला प्रारंभ केला आणि नेमके त्याच साली समर्थ रामदास स्वामी आपल्या कार्याला सातारा ते चाफळ या भागात सुरुवात करतात हा केवळ योगायोग म्हणायचा का ? शिवसमर्थांच्या भावी कार्याच्या दृष्टीने ई.स. १६३१ सालची नाशिक येथील समर्थांची आणि शहाजी राजेंची भेट मला अतिशय महत्वाची वाटे. भावी योजनांची काही तरी चर्चा आणि चिंतन या भेटीत झाले असणार.
सौजन्य : चिंता करितो विश्वाची, पान क्र. ९१ ते ९४
जय जय रघुवीर समर्थ !!!