॥ जय जय रघुवीर समर्थ ॥
श्री संत रामदास स्वामींच्या पावन पदस्पर्शाने पावन झालेल्या व रामदास स्वामींच्या समाधिस्थानामुळे
प्रसिध्द असलेल्या सज्जनगडावर पाण्याच्या दूर्भिक्षामुळे आणि तिथे असलेल्या अशुध्द पाण्यामुळे
भाविकांचे अतोनात हाल होत असतात. सज्जनगडावरील अन्नदान व निवास व्यवस्था पाण्याअभावी
कधी कधी बंद करावे लागते.
या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी श्रीरामदास स्वामी संस्थानाने विना विजखर्चाची पाणी पुरवठा योजना महाराष्ट्र शासनास सादर केली होती. त्या काळात जलसंपदा मंत्री मा. ना. अजितदादा पवार यांनी स्वतः लक्ष घालून ही योजना पूर्ण केली आहे.
परंतु आमदाराने या योजनेच्या उदघाटनास जाहिर विरोध केल्याने योजना पूर्ण होऊनही भाविक, पर्यटक व गडावरील सर्व सेवेकरी या सर्वांना अशुध्द पाण्याचा वापर करावा लागत आहे.
शिवरायांचे प्रेरणास्थान असलेल्या, तीर्थक्षेत्र असलेल्या सज्जनसडासाठी पूर्णपणे तयार झालेल्या या योजनेतून स्थानिक आमदारांच्या मतदार संघातील गावांना पाणी मिळाले पाहिजे असा त्या आमदारांचा मतदार संघातील गावांना पाणी मिळाले पाहिजे असा त्या आमदारांचा आग्रह आहे. खरं तर स्थानिक आमदारांच्या या गावांना लागूनच उरमोडी धरण आहे व या गावांची स्वतंत्र पाणी योजना आज कार्यान्वितही आहे.
सज्जनगडावर आता जे पाणी येणार आहे ते गडाच्या मागील बाजूस साधारणतः ६ कि. मी. लांब असलेल्या पांगारी तलावातून विजेचा वापर न करता पाईपलाईनद्वारे गडावर येणारं आहे. यासाठी मा. अजितदादा पवार यांनी निधी उपलब्ध करुन दिला आहेच तसेच देशभरांतून समर्थभक्तांनी सुध्दा यासाठी अर्थिक मदत केलेली आहे श्री रामदास स्वामी संस्थानचा यांत सिंहाचा वाटा आहेच.
समर्थांच्या निर्वाणानंतर श्री रामदास स्वामी संस्थानाने समर्थांच्या कार्याचा प्रचार व प्रसार करण्याचे काम अव्याहतपणे केले व आजही करीत आहे. सज्जनगडावर झालेल्या विकासात संस्थानचा वाटा मोठा आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
गडावरील विकासामध्ये पाणी हा प्रश्न खूप मोठा आहे व तो संस्थानने शासनाच्या सहाय्याने सोडविलाही आहे. आज ही पाणी योजना उदघाटनाच्या प्रतिक्षेत आहे. केवळ स्थानिक आमदारांच्या नकारात्मक धोरणामुळे हे उदघाटन होवू शकत नाही. आम्हा सर्व समर्थ भक्तांचे मा. आमदारांना आवाहन आहे की त्यांनी या पाणी योजनेला विरोध करु नये.
स्थानिक आमदार मा. शिवेंद्रराजे भोसले व त्यांच्या घराण्याविषयी प्रत्येक समर्थभक्ताला व मराठी मनाला अभिमान आहेच. कृपया त्यांनी विरोध सोडावा अन्यथा यासाठी शांततापूर्ण आंदोलन करावे लागेल याची नोंद घ्यावी.
आंदोलनाची सुरुवात म्हणून सर्व समर्थभक्त नागरिकांच्या संह्यांचे एक निवेदन मा. राज्यपाल महाराष्ट्र राज्य, मुख्यमंत्री मा. पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार, विरोधी पक्ष नेते मा. एकनाथ खडसे आदी जेष्ठ नेत्यांना देण्यासाठी सह्यांची मोहिम सुरु करीत आहोत. आपण आपली स्वाक्षारी/सही या पाठींब्यासाठी आम्हाला द्यावी हि नम्र विनंती.
शेवटी हा समर्थ संदेश,
किती पाजिले पाणी तू तान्हेल्यास । किती अन्न दिले भूकेल्या जीवास ।
किती वेळ दिला प्रभू चिंतनाला । विचारील अंती हरी हे तुम्हाला ॥
आपले,
समर्थ भक्त परिवार, पुणे-मुबंई
श्री समर्थ रामदास स्वामी समुह, (फेसबुक माध्यम)