आत्मपरीक्षणाद्वारे चुकांची दुरुस्ती
व्यवस्थापनामध्ये कोणत्याही कामाचे परिणाम (result or return), त्या कामाचे पृथक्करण (analysis of the job), कार्यपध्दतीमध्ये सुधारणा (improvement in method), कार्याचे पुनर्मूल्याकंन (revaluation), या सर्व गोष्टी फार महत्वाच्या समजल्या जातात. भगवंतानी गीतेमध्ये कर्माच्या
कुशलतेला योग म्हटले आहे. प्रत्येक कर्म सुंदर व्हावे याबाबत समर्थांचा कटाक्ष
होता. माणसे जर त्याच त्याच चुका करीत राहिली असती, तर समाज कसा उभा राहिला असता ?
काही प्रतिभावान माणसे प्रत्येक वेळी नवनवीन चुका करण्याएवढी कुशल असतात. या सर्व
गोष्टी संघटनेला मारक ठरु शकतात. त्यामुळे कार्याचा नाश होतो. अशा वेळी
प्रत्येकाला आत्मपरिक्षण करण्याची गरज असते. या आत्मपरिक्षणालाच भगवंताने
गीतेमध्ये स्वाध्याययज्ञ म्हटले आहे. दासबोधात समर्थ म्हणतात –
लोक नाना परीक्षा जाणती । परी
अंतरपरिक्षा नेणती ।
तेथे प्राणी करंटे होती ।
प्रत्यक्ष आता ॥
सकळ अवगुणामध्ये अवगुण । आपले
अवगुण वाटती गुण ।
मोठे पाप करंटपण । चुकेना की ॥
अचूक यत्न करवेना । म्हणौन केले
ते सजेना ।
आपला अवगुण जाणवेना । काही केल्या
॥
कामामध्ये एखादी चुक झाली म्हणजे परिस्थितीला दोष द्यायचा किंवा अपयशाचे खापर
कुणाच्या तरी माथी फोडायचे, ही माणसाची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. पण ज्याप्रमाणे
एखादा रोग लपवून ठेवल्याने नुकसानच होते, त्याप्रमाणे स्वत:च्या चुकांवर पांघरुण
घातल्याने प्रगतीचे दारच बंद होते. असा मनुष्य स्वत: सुधारत नाही आणि इतरांना नीट
काम करु देत नाही. जीवनातील प्रत्येक अपयशानंतर एकांतात आत्मपरिक्षण करणे गरजेचे
आहे. कुणी जर आपली चूक दाखवून दिली, तर राग न मानता त्याचे आभार मानावेत. यातच
आपले आणि समाजाचे कल्याण आहे. संघटनेच्या विकासाएवढीच स्वत:ची प्रगती महत्वाची
आहे.
समर्थभक्त - सुनील
चिंचोळकर