सर्व मित्रांना जय रघुवीर,
समर्थ रामदास स्वामींनी आपल्या दासबोधात दशक ३ मध्ये समास ४ मध्ये आपल्यापुढे त्याकाळातील परिस्थीतीचे वर्णन करताना खालील सुरवात केली,
लेंकुरें उदंड जालीं । तों ते लक्ष्मी निघोन गेली ।
बापडीं भिकेसी लागलीं । कांहीं खाया मिळेना ॥
ह्यात त्यानीं त्याकाळातील जसे वर्णन केले तसेच आजही चित्र दिसते आपण देशाची स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची १५वी लोकसभा निवडणुक पहात आहोत आणि अनेक मुद्दे हे देशाच्या विकासाचे आहेत. ज्या राजकीय पक्षाला देशाचा विकास करण्याचा मानस आहेअ त्यांना आणि देशवासीयांना नम्र विनंती की कुटुबंनियोजनाचा गंभीर प्रश्न लक्षात घ्यावा ! सध्या देशाचा विकास हा लोकसंख्या वाढीतुनच दिसत आहे.
देवसेंदिवसा खर्च वाढला । यावा होता तो खुंटोन गेला ।
कन्या उपवरी जाल्या, त्यांला- । उजवावया द्रव्य नाहीं ॥
वाढती लोकसंख्या ही निश्चितच महागाईला निमंत्रण देत असते आणि जस जसा काळ बदलतो तस तसे जीवनपध्दती बदलते. खर्च उत्पनांपेक्षा आकाराने मोठा असतो आणि जर रोजगार नाहीच मिळाला तर गुन्हेगारीला निमंत्रण मिळतेच तसेच उत्पनांचे मार्ग बदलतात. बर ! रोजगार मिळावा म्हणंल तर शिक्षण किती हा प्रश्न नेहमी येतो आणि त्यामागुन अनुभव !
मायेबापें होतीं संपन्न । त्यांचें उदंड होतें धन ।
तेणें करितां प्रतिष्ठा मान । जनीं जाला होता ॥
ज्यांची अर्थिक, कौटुंबिक परिस्थीती चांगली आहे त्यांचे भागून जाते, त्यांना किमान परिश्रम करावे लागता परंतु आपण आपल्या मनाला विचारावे आई-वडिल किती दिवस पुरणार आहेत आणि आपण स्वावलंबी का होउ शकत नाही ? नरदेह हा स्वाधेन ! सहसा नव्हे पराधेन अरे जर आपण शरीराने धडधाकट आहोत तर मग मनानेच का पांगळे ?
आपण खातों अन्नासी । अन्न खातें आपणासीं ।
सर्वकाळ मानसीं । चिंतातुर ॥
पुन्हा वाढती लोकसंख्या आणि दुर्दैवाने देशातील शेतकर्यांची आत्महत्या, अस्मानी-सुलतानी ! किती दिवस असे चालवायचे ? निसर्गापुढे आपण निश्चितच जाऊ शकत नाही पण निसर्गाचा होणारा र्हास यासाठी देखील जबाबदार आहोतच, वाढत्या लोकांना निवासा करता जागा आणणार कोठुन, अशी किती कोरडवाहु जमीन शिल्लक आहे आणि लोकसंख्येला आळा घातला नाही तर वाढत्या लोकसंख्येला अन्न देण्यासाठी कोरडवाहु जमीनीवर पीक कसे कसता येईल याचा अभ्यास केव्हा होणार आणि ती भुमी त्यांच्या निवासासाठी दिली तर शेतीसाठी जमीन आहे कोठे ? प्रश्नात प्रश्न !
आता भलतैसें करावें । परि द्रव्य मेळऊन न्यावें ।
रितें जातां स्वभावें । दुःख आहे ॥
नेता असो वा सामान्य माणुस, जीवन व्यतित करण्यासाठी अर्थांजन तर आवश्यकच आहे. चाकरी केली आणि पगारच मिळाला नाही तर रिकाम्या हाती गृही जावे तरी कसे. मग पुन्हा येरे माझ्या मागल्या चोरी, दरोडा, अगदी भ्रष्टाचार आणि अन्य गुन्हे.
जन्म अवघा दुःखमूळ । लागती दुःखाचे इंगळ ।
म्हणोनियां तत्काळ । स्वहित करावें ॥
असो ऐसें वृद्धपण । सकळांस आहे दारुण ।
म्हणोनियां शरण । भगवंतास जावें ॥
समर्थांच्या दासबोधातील दशक ३ मधील ह्या समासांचे नाव खरोखरच प्रत्येकाला स्वगुणांची परीक्षा घेण्याचा विचार करायला लावण्यास सार्थ आहेत आणि अनेक गोष्टी ह्यातुन प्रत्येक समाजाला, समुदायाला आणि देशाच्या नागरिकाला शिकण्या सारख्या आहेत.
आपण सर्व वाचक ज्ञानी आहात, वरील लेखनक्रियेत माझ्या पामराकडुन काही चुका झाल्या असल्यास मोठ्या मनाने माफ कराल ही खात्री….
जय जय रघुवीर समर्थ !!!