Thursday, March 17, 2011

समर्थांचे संभाजी राजेंना गद्य पत्र !!!



समर्थांचे संभाजी राजेंना गद्य पत्र

अकरा सूचना : सन १६८१

दुर्मति संवस्तरी पुष्य वदी नवमीस श्री ......... की आपला संपूर्ण प्रसंग संनीधची आहे ऐसे म्हणोनी ते समई राजश्री 

(संभाजी) यासी कित्येक कृपापूर्वक वचने -

॥१॥ श्री शिवराज कैळासवासी यांचे वंश्परंपरेसी राज्यभोग बहुत आहे.

॥२॥ वर्षे पाचपर्यंत अति कठिण आहे. दैवी प्रार्थना सावधानतेने रक्षिले पाहिजे.

॥३॥ पूर्वि राजश्रीस (शिवाजी) राजधर्म व क्षात्रधर्म व आखंड सावधान ऐसी पत्रे पाठवली होती. ती पत्रे प्रसंगानुसार वाचून मनासि आणून वर्तुणूक होईल तरी त्या वचनाचा अभिमान श्री देवासि आहे.

॥४॥ नळ संवस्थरि १८ शस्त्रे समर्पिली ते समई - श्रीचे इच्छेने राजश्री यांसि कितेक आशीर्वाद वचने प्राप्त जाली तो अर्थ काही घडला असेल आणिकहि द्वादश वर्षा उपरी उत्कट भाग्य आहे ते समईचा संकल्प वाक्य लेखी लेख होता स्मरण मात्र द्यावे.  कोण्हे समई कोण्हासि काय घडणार ते सुखे घडेल.

॥५॥ संनिध वस्त्रपत्रादिक जो पदार्थ होता तो सर्व श्रीस समर्पिला. चाफळी प्रसंगानुसार श्रीच्या देवळयाचा कार्यभाग घडोनि येईल हा ही पदार्थ राजश्रीच्या विचारे त्या चि कार्यासि लावावा अथवा महाद्वारी दीपमाला कराव्या.

॥६॥ प्रमादि संवस्तरी सींगणवाडीचे मठी राजश्रीनी श्री च्या सर्व कार्याचा आईकार केला त्या प्रमाणे त्यांनी नित्य उत्सव व यात्रा समारंभ उत्तम चालविला. पुढे ईमारतीचेही स्मरण द्यावे हे त्यानी मान्य केल्यावरि आपण सज्जनगडी सुखे वास्तव्य केले.

॥७॥ श्री च्या भोगमूर्ती आणविल्या त्याचि प्रतिष्ठा मल्लारि निंबदेव त्याच्या बंधूच्या हस्ते करावि.

॥८॥ कर्नाटक रितीचा रथ करुन या भोगमूर्ती आणवून प्रतिवर्षी रथोत्साव केल्याने राज्यासी कल्याण आहे. वार्षिक चिन्ह दिसोनी येईल. विशेष चिन्ह दिसोनी येईल. त्याउपरि श्रीचे इमारतीसी आरंभ करावा एक शत येकवीस खंडी धान्य संकल्पाची गती सांगावी.

॥९॥ श्रीचे देवालय अशक्त जाले नदी संनीध आहे.

॥१०॥ पूर्वी येक प्रसंग जाला होता राजश्री श्रीच्या दर्शनासी सज्जनगडासी येणार म्हणोनि स्छळसिध्दीकारणे मनुष्य आले होते ते समईचे वर्तमान । उत्तरेकडील राजपुत्राचे आगमन जाले म्हणोनि ऐकिले ते समयी आता काय आला म्हणोनि बोलिले परंतु या उपरिही ते प्रांतीचे लोक अनुकूळ करुन घेतील तरी उभयता योगे कार्यसिध्दीच आहे परंतु त्वरा पाहिजे । प्रतिवर्षी श्रीचे यात्रेसी राजगृहीहून येक भले मनुष्य संरक्षणासी पाठवीत जावे व समारंभादि रथोत्साव समऊ हस्ती २ कर्णे २ वाद्ये जोडे २ तीवाशे २ जमाखाने २ शामिने २ येणेप्रमाणे पाठवून  श्रींचा यात्रासमारंभ संपादुन पदार्थ फिराऊन आणित जावे हा हि निश्चय पूर्वीचाचि आहे. लेख हि होता.

॥११॥ श्रीचे पेठेचे पत्र दृश्य करावे कार्यकर्ते नीति वदावी । श्री कार्यासि अतितत्पर ऐंशा पुरुषाच्या योगे धर्मवृत्धी आहे धर्मवृत्धीने राज्यवृत्धि आहे ॥

इतके बोलिलो स्वभावे । यात मानेल तितुके घ्यावे ।
श्रॊती इदास न व्हावे । बहु बोलिलो म्हणोनि ॥

औदार्य धर्ममूर्ती । काय लिहिणे तयाप्रती ।
धर्मस्छापनेची कीर्ती । सांभाळली पाहिजे ॥

देवद्रोही यांचा नाश चि आहे
समुद्रतीरस्छांचा नाश आहे.

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥