श्रीराम !!!
भारतभ्रमणात पाहिलेले अनन्वित अत्याचार त्यांनी मातेस व श्रेष्ठ गंगाधरस्वामींना निवेदन केले.
समर्थ आईस म्हणाले -
“ आई, तुझ्यापेक्षा एक मोठी आई मला हाक मारते आहे. श्रेष्ठांसारखे अनेक देशबांधव माझी प्रतीक्षा करत आहेत. मला आता या छोट्या मायापाशात बध्द करु नकोस. राष्ट्राच्या उत्थानार्थ मला प्रेमाचा निरोप दे. अशा हजारो युवकांचे बलिदान या राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात हवे आहे. ”
राणूबाई एकदम उठून आत गेल्या.; त्या कशासाठी गेल्या त्या ते समर्थांना कळेना. हातात पळी, फुलपात्रे घेऊन त्या आल्या व पोरावर पाणी सोडून म्हणाल्या -
“ नारायणा, हे तुझ्यावर पाणी सोडले. खुशाल राष्ट्रासाठी आपले जीवन अर्पण कर. फक्त एकच अट आहे, माझ्या अंतकाळी मात्र जरुर ये. तुझ्या हातचे पाणी घेऊनच मी जगाचा निरोप घेईन. ”
समर्थांनी आईला वचन दिले. वैशाख संपला व समर्थांनी मातेचे व श्रेष्ठांचे प्रेमळ आशिर्वाद घेतेले. सारे जांब गाव समर्थांना निरोप देण्यासाठी गावाबाहेर वेशीजवळ जमले होते. ग्रामस्थांनी हार घालून त्यांचा सत्कार केला. राणूबाईंचे डोळे सुखावले. देशस्थितीचे गांभीर्य ध्यानात घेऊन एका मातेने आपला एक पुत्र राष्ट्राच्या झोळीत टाकला. सामान्य माणसाचे अश्रू पुसण्यासाठी मातेने एक प्रचारक धाडला.
सज्जन हो,
हे सर्व जाणुन घ्या. आजही या राष्ट्राच्या झोळीत अनेक प्रचारकांची गरज आहे. जे समर्थ कार्य आहे ते अजून अर्धवटच आहे. आज पुन्हा या राष्ट्रमातेला अशा अनेक आईंच्या युवकांची गरज आहे. हे गांभिर्य सर्व सद्य पिढीने लक्षात घ्या. नाहीतर पुढे आपण कोणताच आदर्श समाजाला दाखवू शकणार नाही.
सर्व मातांना पण श्रीसमर्थ हे सांगत आले आहेत आणि आजही सांगत आहेत,
“ देव मस्तकी धरावा । अवघा हलकल्लोळ करावा ।
मुलुख बडवा कि बुडवावा । धर्म संस्थापनेसाठी ॥ ”
जय जय रघुवीर समर्थ !!!