बेगने 'जिहाद'साठी युवकांना प्रवृत्त केले
सकाळ वृत्तसेवा
नाशिक - पुण्याच्या जर्मन बेकरी स्फोटातील संशयित हिमायत बेगने देशाच्या विविध क्षेत्रांत जाऊन तरुणांचा गट तयार करणे व जिहादसाठी युवकांना प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला होता. स्फोटाच्या या मॉड्युलमध्ये अतिशय संवेदनशील माहिती व मुद्दे समोर येऊ लागल्याने दहशतवादविरोधी पथकाने त्याच्या मुळाशी जाऊन माहिती घेण्यास सुरवात केल्याचे आज न्यायालयात सांगितले. त्यासाठी हिमायत बेग याची येत्या 25 ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली.
बेगला आज नाशिकच्या न्यायालयात हजर केल्यावर या स्फोट व खटल्याशी संबंधित विविध माहिती न्यायालयात ऍड. अजय मिसर यांनी सादर केली. त्यानुसार बेग 2008 मध्ये श्रीलंकेत गेला होता. विविध शहरांना त्याने भेटी दिल्या. त्याचा उद्देश काय होता हे स्पष्ट झालेले नाही, मात्र त्यासाठी त्याला लष्करे तय्यबाने पैसे पुरवले होते. नाशिकसह नागपूर, मुंबई व अन्य शहरांनाही त्याने भेटी दिल्या होत्या. त्यामुळे या शहरांत त्याने काय पाहणी केली व उद्देश काय होता याची माहिती संकलित करायची आहे. ज्या दिवशी 7 सप्टेंबरला बिलालला दहशतवादविरोधी पथकाने अटक केली त्या दिवशी दोघांत सुमारे तासभर मोबाईलवर संभाषण झाले होते. त्याची माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे. त्यातून कदाचित संवेदनशील माहिती मिळण्याची शक्यता आहे. मोड्युल म्हणून भारतात दहशतवादी कारवायांचे जाळे पसरविण्यासाठी हिमायत लष्करे तय्यबातर्फे युवकांचे जाळे तयार करण्याचे व त्यासाठी त्यांना जिहादची माहिती देणे, प्रवृत्त करण्याचे काम करीत होता.