छपन्न भाषा तितुके ग्रंथ | आदिकरून वेदांत | या इतुकियांचा गहनार्थ | येकचि आहे || श्रीराम
इंग्रजी भाषा बरेच काही शिकवत असेल आणि स्पर्धा युगात आवश्यक आहे परंतु ही भाषा व्यक्तीमत्वात सुद्धा आमुलाग्र बदल घडवून आणते त्यामुळे प्रत्येक जातीतला / वर्गातला समाज जर ही भाषा शिकत असेल तर विचार सुद्धा बदलतील उदा. न्हाव्याचा मुलगा वडिलांचा धंदा सोडून IT मध्ये गेला, चाभांराचा मुलगा इंजिनिअर झाला किंवा शेतकरी च्या मुलाने शेती सोडून नोकरी करायचे ठरवले तर प्रत्येक मराठी माणुस हा सगळा व्यवसाय करणार का ?
मग आपापल्या मातृभाषेचा आधी विचार करा, मातृभाषा ही केवळ अभ्यासक्रमात विषय / भाषा म्हणून न बघता तिचा विस्तृत विचार करा.समर्थ रामदासांनी सुद्धा सांगितले आहे "सकळ साधनांचे फळ | ज्ञानाची सिगचि केवळ | जेंणे संशयाचें मूळ | निशेष तुटे ||
तरीही आपण काहीही ज्ञान घेतलेले नाही. बाहेरील देशांमध्ये बरेच जण फिरलेले असतील जे उच्चभ्रू शिक्षित आहेत मग त्यांनी तिथे भाषा प्रेम पाहिलेले नाही का ?
मातृभाषा याचा मुळात अर्थ समजावून घेऊया, मातृ म्हणजे आई - जननी आणि भाषा म्हणजेच वाणी, आई ही सगळ्यांनाच प्रिय असते ना मग या आईसमान वाणीचा, भाषेचा आपण आदर केलाच पाहिजे, गेल्या काही काळापासुन वृद्ध झालेल्या आई वडिलांना वृद्धाश्रमाची जशी वाट दाखवली जाते आहे तसेच या मातृभाषेचे होत चालले आहे, हे थांबवा !
अन्यथा पुढील काही काळानंतर मातृभाषा ही सुद्धा जंगलातील वाघ, सिंह यांप्रमाणे नष्ट होऊन जाईल आणि फक्त इंग्रजांनी दिलेली हिंग्लिश भाषा सर्वत्र राहील याचा अजून एक अर्थ होतो तो म्हणजेच इंग्रज लोकांची आपण गुलामी केली आता त्यांच्या भाषेची गुलामी स्विकारायची.
अजून सध्या तरी काही शाळांमध्ये (महाराष्ट्रात) प्रतिज्ञा ही मातृभाषेतच होते आहे आणि राष्ट्रगीत हे हिंदीतच म्हंटले जाते पण आता इंग्रजी माध्यमातील मुले मात्र भारत माझा देश आहे हे मातृभाषेत (अभिमानाने) म्हणूच शकणार नाहीत. शेवटी इंडिया इस माय कंट्री आणि माझा देश आहे यातले वजन आणि अभिमान काही वेगळाच आहे, शाळांनो जाग्या व्हा आणि विद्यार्थ्यांनो जागे व्हा (माणुस हा जन्मभर विद्यार्थीच असतो) आणि सरकार ने पण झोपेचे सोंग सोडले तर बरे होईल !