Monday, January 10, 2011

रामी रामदास शक्तीचा शोध !!!



भगवंतानी भगवदगीतेत आपल्या विभूती सांगत असताना शस्त्रधार्‍यांमध्ये मी राम आहे असे म्हटले आहे. वस्तुत: प्रभू रामचंद्र म्हणजे सौजन्य आणि कारुण्य यांची मूर्ती. पण रामचंद्रांनी शस्त्रांचा कधी त्याग केला नाही. वनवासात जाताना त्यांनी अलंकार, भूषणे टाकून दिली पण वल्कले परिधान केली. मस्तकावरील कोवळ्या केसांना झाडाचा चीक लाऊन जटा वळल्या. तपस्व्याची सर्व बाह्यचिन्हे धारण करणार्‍या प्रभूंनी आपल्या धनुष्याचा त्याग केला नाही. कोदंडपाणी हे रामाचे विशेषण यथार्थ आहे. शस्त्रधार्‍यांमध्ये मी राम आहे असे भगवान श्रीकृष्ण म्हणतात याचे आणखी एक रहस्य आहे. राम म्हणजे सज्जनता. सज्जन माणसांनी शस्त्रे बाळगली पाहिजेत कारण शस्त्राचा वापर कसा करायचा याचा विवेक सज्जनांजवळ असतो. आज जगामधे सगळ्या मुस्लीम आणि ख्रिश्चन राष्टांकडे भरमसाठ शस्त्रे आहेत. या शस्त्रांच्या जोरावर ते जगभर दहशतवाद वाढवत आहेत. आम्ही मात्र अजूनही अहिंसेचीच उपासना चालवली आहे. २००० साली डॉ. अब्दुल कलाम आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या कारकिर्दीत आम्ही पहिल्यांदा अण्वस्त्रांची चाचणी घेतली. आमचे हे बळ पाहूनच भारतावर आक्रमण करण्याचा मोह पाकिस्तानने टाळला. एक सुंदर इंग्रजी वाक्य आहे - "The best way to avoid the war is to be prepared for war for all the times" युद्धाला सर्वकाळ सज्ज असणे हाच युध्द टाळण्याचा एकमेव उपाय आहे. 

जर भारताला जगातील शस्त्रीकरणाच्या स्पर्धेत जिवंत राहायचे असेल तर अहिंसेचा नाद सोडून छत्रपती शिवाजी आणि समर्थ रामदास यांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून शस्त्रसज्ज व्हावे लागेल. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारत परतंत्र असताना लष्कराच्या भरतीचे केलेले आवाहन आज पूर्वीपेक्षा जास्त महत्वाचे होऊन बसले आहे. क्रिकेटपेक्षा आणि नटनट्यापेक्षा "जय जवान जय किसान" या मंत्राची राष्ट्राला जास्त गरज आहे. दुष्ट माणसांच्या हातात शस्त्रे आली म्हणजे सज्जनांना त्यांच्या अहिंसात्मक धोरणासकट ते नष्ट करणार.

तत्कालीन राजकारणातील ही नाडी समर्थांनी ओळखली म्हणून त्यांनी रामकथेचा पुरस्कार केला. "रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड न्यावी" असा आदेश समर्थांनी कीर्तनकारांना दिला याचे आणखी एक महत्वाचे कारण म्हणजे त्या काळात अरबस्तानातून आलेले पठाण हिंदूंच्या तरुण मुली पळवून नेत होते. रावणानेसुद्धा सीतेला पळवूनच नेले होते; पण रामचंद्र घाबरले नाहीत. निराश तर मुळीच नाहीत. नाही तरी जग मिथ्याच आहे आणि प्रपंच नश्वर आहे म्हणून निष्क्रिय झाले नाहीत. उलट त्यांनी भिल्ल, वनवासी, आदिवासी, गोंडाळ, वानर यांच्यातून सैन्य निर्माण केले. या सर्वांची संघटना उभी केली. अविश्रांत परिश्रमाने सागरावर सेतू बांधला आणि लंकेवर आक्रमण करून रावणाचा त्याच्या समर्थकांसह वाढ केला. रामकथा प्रसारित करण्यामागे समर्थांना हे सुचवायचे होते की, जे यवन तुमच्या स्त्रिया पळवून नेतात त्यांचाशी दोन हात करण्यासाठी संघटीत व्हा, आक्रमक व्हा, बलशाली व्हा, शस्त्रसज्ज व्हा आणि जे लोक तुमच्या स्त्रिया पळवून नेतात त्यांना ठार करा.
रामकथेतील प्रसंग झटकन मनावर ठसण्यासारखा होता. कारण स्त्रिया पळवून नेणे, स्वत:चे सैन्य नसणे या बाबतीत रामांची परिस्थिती सामान्य माणसांसारखीच होती. परंतु त्यांनी त्यातून मोठ्या धीराने मार्ग काढला. लोकांनी बलशाली व्हावे म्हणून समर्थांनी गावागावात हनुमंताची मंदिरे उभी केली. हि मंदिरे म्हणजे त्या काळातील व्यायामशाळा होत्या. समर्थांचे बहुसंख्य शिष्य किशोरवयीन किंवा तरुण होते. या सर्वांना समर्थांनी व्यायामाची दीक्षा दिली. हनुमंताची जी आरती समर्थांनी रचली आहे त्यात शेवटी समर्थ म्हणतात -

"रामी रामदास शक्तीचा शोध." आचार्य चाणक्य यांनही स्पष्टपणे म्हंटले आहे कि, कुठल्याही राष्ट्राचा विकास अथवा प्रगती त्याच्या आक्रमण करण्याच्या शक्तीवर अवलंबून असते. युद्धानंतर कोणतेही राष्ट्र झात्याने प्रगत होते हे जर्मनी आणि इस्रायलचा इतिहास आपल्याला शिकवतो. अहिंसेची आणि शांततेची भाषा ऐकायला कितीही गोड असली आणि आदर्शवादी वाटत असली तरी युद्धाची वास्तविकता नाकारता येणार नाही. भगवान रामचंद्र, महावीर हनुमान, भगवान श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्रातून युद्धाचे प्रसंग वगळा आणि त्यांचे चरित्र लोकांना सांगा ! पराक्रम वजा केला तर त्यांच्या चरित्रातून नेमकी कोणती प्रेरणा घ्यावयाची ?

सौजन्य : चिंता करितो विश्वाची, पान क्र. ११८ ते ११९ 
               जय जय रघुवीर समर्थ !!!