Friday, June 29, 2012

॥ श्रीसमर्थकृत कलियुग पंचक ॥


॥ कलियुग पंचक ॥

आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥१॥
जैसा कली राजा झाला । धर्म अवघाचि बुडाला ॥२॥
नीतिमर्यादा उडाली । भक्ति देवाची बुडाली ॥३॥
दास म्हणे पाप जाले । पुण्य अवघेचि बुडाले ॥४॥

विप्री सांडिला आचार । क्षेत्री सांडिला विचार ॥१॥
मेघवृष्टी मंदावली । पिके भुमीने सांडिली ॥२॥
बहुवृष्टी अनावृष्टी । दास म्हणे केली सृष्टी ॥३॥
आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥

लोक दोष आचरती । तेणे दोषें भस्म होती ॥१॥
जनीं दोष जाले फार । तेणे होतसे संहार ॥२॥
रामदास म्हणे बळी । दिसेंदिस पाप कळी ॥३॥
आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥

नाही पापाचा कंटाळा । येतो हव्यास आगळा ॥१॥
जना सुबुद्धी नावडे । मन धावे पापाकडे ॥२॥
रामी रामदास म्हणे । पुण्य उणे पाप दुणे ॥३॥
आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥

पुण्यक्षेत्रे ती मोडावी । आणि ब्राह्मणे पीडावी ॥१॥
पुण्यवंत ते मरावे । पापी चिरंजीव व्हावे ॥२॥
रामदास म्हणे वाड । विघ्ने येती धर्माआड ॥३॥
आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥

लोक भेणेचि चालती । त्यास होताती विपत्ती ॥१॥
धर्मवृत्ती ते बुडावी । शास्त्रमर्यादा उडावी ॥२॥
रामदास म्हणे देवे । बौद्ध होऊन बैसावे ॥३॥
आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

Tuesday, June 26, 2012

अस्मानी सुलतानी...तेव्हाही...आताही ....

॥ श्रीराम समर्थ ॥: अस्मानी सुलतानी...तेव्हाही...आताही ....: अस्मानी सुलतानी ॥ प्रबंध दुसरा ॥ जन बुडाले बुडाले पोटेविण गेले । बहु कष्टले कष्टले किती येक मेले । वीसा लोकांत लोकांत येक चि राहिले । तेणे ...

अस्मानी सुलतानी...तेव्हाही...आताही ....

अस्मानी सुलतानी

॥ प्रबंध दुसरा ॥

जन बुडाले बुडाले पोटेविण गेले ।
बहु कष्टले कष्टले किती येक मेले ।
वीसा लोकांत लोकांत येक चि राहिले ।
तेणे उदंड उदंड दु:ख चि साहिले ॥ध्रु॥

काही मिळेना मिळेना मिळेना खायाला ।
ठाव नाही रें नाही रें नाही रें जायाला ।
हौस कैची रें कैची रें कैची रें गायाला ।
कोठे जावे रें जावे रें जावे रें मागायाला ॥१॥

शेत पीकेना पीकेना पीकेना उदंड ।
कष्ट करुनी करुनी होत आहे भंड ।
अवघे जाहाले जाहाले जाहाले थोतांड ।
दुनिया पाहातां पाहातां उदंड जाली लंड ॥२॥

देश नासला नासला उठे तो चि कुटी ।
पिके होता चि होतां चि होते लुटालुटी ।
काळाकरीता जीवलगां जाली तुटातुटी ।
अवध्या कुटूंबा कुटूंबा होते फुटाफुटी ॥३॥

कैचां आधार आधार नाही सौदागर ।
काही चालेना चालेना उदीम व्यापार ।
सर सारीखे सारीखे जाला येकंकार ।
काळ कठीण कठीण कैसा पावे पार ॥४॥

नलगे हांसावे हांसावे सगट सारीखे चि ।
लोक तुटले तुटले संसाराची ची ची ।
जनी ईजती हुरमती पाहो जाता कैची ।
दुनिया जाली रे जाली रे जाली रे बळाची ॥५॥

धान्ये माहाग माहाग जैसे ही मिळेना ।
कैसे होईल होईल होईल कळेना ।
काये होणार होणार होणार टळेना ।
पुण्य गेलें रें गेलें रें काहीच फळेना ॥६॥

पाऊस पडतो पडतो उदंड पडतो ।
नाहीतरी उघडे उघडे अवघा अवघा उघडतो ।
पीळ पेंचाचा पेंचाचा प्रसंग घडतो ।
लोक उधवेना उधवेना औघा च दडतो ॥७॥

सुडके पटकर पटकर न मिळे पांघाराया ।
शक्ति नाही रें नाहीं रें कोंपट कराया ।
वाट फुटेना फुटेना विदेसी भराया ।
अवघी बैसलो बैसलो बैसलो मराया ॥८॥

बायेला लेकुरें लेकुरें सांडूनिया जाती ।
भीक मागती मागती तिकडेंची मरती ।
रांडा पोरांच्या पोरांच्या तारांबळी होती ।
मोल मजुरी भिकारी होऊन वाचती ॥९॥

बरे होईल होईल लागलीसे आस ।
बरे होईना होईना आसेची निरास ।
काळ आला रे आला रे जाहाले उदास ।
काही केल्याने केल्याने मिळेना पोटास ॥१०॥

नदी भरतां भरतां घालुनीया घेती ।
वीखं घेऊनी घेऊनी उदंड मरती ।
अग्नि लाऊनी लाऊनी जळोनियां जाती ।
मोठी फजिती फजिती सांगावे तें किती ॥११॥

येक पळाले पळाले दुरी देशा गेले ।
बहु कष्टले कष्टले तेथे नागवले ।
फीरोनी आलें रें आलें रें घरीचे लोक मेले ।
कोठे उपाये दीसेना कासावीस जालें ॥१२॥

उदंड चाकरी चाकरी मिळेना भाकरी ।
लोक नीलंड नीलंड काढुनी नेती पोरी ।
न्याये बुडाला बुडाला जाहाली सिजोंरी ।
पैंक्या कारणे कारणे होते मारामारी ॥१३॥

कोण्ही वाचलां वाचलां तो सवें चि नागावला ।
उदीमा गेला रे गेला रे तो मध्येचि मारीला ।
काही कळेना कळेना कोण्हाचे कोणाला ।
येतो येकाकी येकाकी अकस्मात घाला ॥१४॥

येतो पाहुणा पाहुणा लौकरी जाईना ।
अन्न खातो रे खातो रे थोडे ही खाईना ।
उदंड वाढीले वाढीले तर्हीे तो धाईना ।
गर्वे बोलतो बोलतो कोठे चि माईनां ॥१५॥

लोक झिजले झिजले झ्डेसीच आले ।
दारी बैसले बैसले उठेनासे जाले ।
ईरे नाही रे नाही रे बुध्दीने सांडिले ।
अन्ना कारणे कारणे उदंड धादावले ॥१६॥

लोक खाती रे खाती रें तेथेचि हागती ।
रती उठती उठती भडभडां वोकीती ।
उदंड घेतले घेतले अखंड उचक्या देती ।
कर्पट ढेकरें ढेकरें राऊत सोडिती ॥१७॥

राहे वस्तीस वस्तीस चोरीतो वस्तांस ।
खोटा अभ्यास अभ्यास हाणी महत्वांस ।
परी तो सांडेना सांडेना ठकीतो लोकांस ।
पुढे ठके रे ठके रे ठके अवेवास ॥१८॥

लोक भलेसे दीसती खेटरे चोरीती ।
वस्त्रे घोतरे पातरे लपउनी पळती ।
कोठे धरीती मारीती महत्वा हारीती ।
काये करीती करीती वाईट संगती ॥१९॥

दास म्हणे रे भगवंता किती पहासी सत्व ।
काय वांचोनी वांचोनी ने परते जीवीत्व ।
किती धरावे धरावे धरावे ते सत्व ।
जाली शरीरें शरीरें शरीरें नीसत्व ॥२०॥

(इंदुरबोधन बाड क्र. ४, डोमगाव बाड क्र. ३)