Wednesday, January 26, 2011

शिव-समर्थ भेट, आक्षेप व खंडन





श्रीराम ! 

आज बरेच दिवसांनी या ठिकाणी लिखाणासाठी यावे लागले. त्यास कारण हि असे कि सध्या छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने जो ब्रिगेड अथवा सत्यशोधक संघटना चालवली जात आहे त्यात जो ब्राह्मण द्वेष चालू आहे त्याबद्दल काही ब्रिगेडीनां सांगावेसे वाटते. समर्थ रामदास स्वामी यांचे कार्य संपूर्ण देशाला माहित आहे असे म्हणणे आणि न म्हणणे दोन्ही चुकीचे राहील. कारण ज्यांना माहित आहे अथवा ज्यांनी समर्थ रामदास स्वामींचे समग्र साहित्य, ग्रंथ वाचन केले आहे तो असे बिनबुडाचे आरोप करणार नाही आणि ज्यांनी पहिले वा वाचेलेच नाही त्यांस काय कळणार. यावर स्वत: समर्थ रामदास स्वामी म्हणतात " समूळ ग्रंथ पाहिल्याविण | उगाच ठेवी जो दूषण | गुण सांगतां अवगुण | पाहे तो येक पढतमूर्ख ". मुळात त्याकाळातील तत्कालीन परिस्थिती न पाहता, न अनुभवता आरोप-प्रत्यारोप करणे चुकीचे. शिव समर्थ भेट सुद्धा कधी जाली नाही असे यांचे म्हणणे आहे यावर अभ्यास करून पुढील माहिती मिळते.

समर्थ रामदास स्वामी आणि  छत्रपती शिवाजी महाराज यांच्यातला पत्र-व्यवहार फार मौलिक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांच्या वडिलांनी कळवलं की, समर्थ रामदास आपल्या खोर्‍यामध्ये आलेले आहेत. चाफळखोर्‍यात त्यांनी राममंदिर बांधलेले आहे. तू त्यांची भेट घे आणि त्यांची मदत घे. हे ऐकून छत्रपती शिवाजी महाराज समर्थांना भेटण्यासाठी म्हणून चाफळला आले. समर्थ रामदास तिथे नव्हते, त कुठेतरी भिक्षेकरता निघून गेले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा माणूस नरसोमालनाथ अंबरखाने यांनी छत्रपती शिवाजी महाराज येऊन गेल्याच समर्थ रामदासांना नंतर सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला भेटू इच्छितात हे कळल्यावर समर्थ रामदासांनी चौकशी केली, की सध्या महाराज कुठे आहेत. महाराज वाईला आहेत ही कळलं आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना एक सुंदर पत्र समर्थ रामदासांनी लिहिलं आणि समर्थ शिष्य दिवाकर गोसावी बरोबर वाईला पाठविलं.

या पत्राबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण म्हणत असत कि समर्थ रामदासांनवरती अफाट काव्य निर्माण झाले, छत्रपती शिवाजी महाराजांची स्तुती करणार्‍या कितेक कविता तयार झाल्या परंतु समर्थ रामदासांनी या पत्रातील काव्यामध्ये शिवाजी महाराजांचे जे वर्णन केलेलं आहे तास वर्णन आपल्याला कोणत्याही काव्यात पाहायला मिळत नाही. पत्रात समर्थ रामदास लिहितात,

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंत योगी ॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥

आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥

देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥

या भूमंडळचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥

समर्थ रामदासांनी शिवाजी महाराजांना अफजल खानाच्या वधाच्या वेळी जे पत्र पाठविले आहे, त पण मौलिक आहे. या पत्राचे वैशिष्ठ म्हणजे कि पत्राच प्रत्येक ओळीच पाहिलं अक्षर जर घेतल तर "विजापूरचा सरदार निघाला आहे" अशा प्रकारची सूचना मिळते.
अफजल खानाचा सगळा मार्ग जर आपण पहिला तर पंढरपूर, म्हसवड, फलटण नंतर वाई, हा सगळा रस्ता जो आहे. या सगळ्या रस्त्यात जोगोजागी समर्थ रामदासांचे मठ आहेत.

वाई परिसरात समर्थ रामदासांचे कमीतकमी दहा मठ आहेत. ज्या प्रतापगडावरती अफजल खानाला मारलं त्या प्रतापगडावर समर्थांचा मठ आहे. तिथून पाच मैलावरती पारगाव खंडाला आहे. तिथे समर्थ रामदासांचा मठ आहे. पसरणीचा घाट आहे त्या पसरणीला समर्थ रामदासांचा मठ आहे. महाबळेश्वरला समर्थ रामदासांचा मठ आहे. महाबळेश्वरहून सातार्‍याला जाताना मेढा मधे लागतं, त्या मेढ्याला समर्थ रामदासांचा मठ आहे. पाचगणीच्याखाली कण्हेरी नावाच गाव आहे. तिथे समर्थ रामदासांचा मठ आहे.

कण्हेरीपासून दहा मैलावर शिरवळ आहे. तिथे समर्थ रामदासांचा मठ आहे. अफजल खान येत असल्याची वार्ता या पत्राद्वारे छत्रपती शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचवण्याचे काम समर्थ शिष्य वासुदेव गोसावी यांनी केलेलं आहे, आणि ते सगळ पत्र मोठे गमतीशीर आहे. ते खालील प्रमाणे,

वि॒वेके करावे कार्यसाधन | जा॒णार नरतनु हे जाणून |
पु॒ढील भविष्यार्थी मन | र॒हाटोचिं नये॥

चा॒लो नये असत्मार्गी | स॒त्यता बाणल्या अंगी |
र॒घुवीरकृपा ते प्रसंगी | दासामहात्म्य वाढवी॥

र॒जनीनाथ आणि दिनकर | नि॒त्यनेमे करिती संचार |
घालिताती येरझार। लाविले भ्रमण जगदीशे॥

आ॒दिमाया मूळ भवानी। हे॒चि जगाची स्वामिनी।
येकांती विवंचना करोनी । इष्ट योजना करावी॥

असे पूर्ण सगळं पत्र वाचलं तर सबधं आध्यात्मिक उद्देश आहे. पण पहिली अद्याक्षर पहिली तर “ विवेके करावे कार्यसाधन | जाणार नरतनु हे जाणून ”  " विजापूरचा सरदार निघाला आहे " अशा प्रकारे समर्थ रामदासांनी पत्राद्वारे गुप्त राजकारण केलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वर्णन ते इतक्या अत्यंत प्रभावीपणे करतात, तितक्याच वाईट विशेषणांनी संयुक्त असं अफजल खानाचे हि ते वर्णन करतात. ते पहा,

तुंड हेंकाड कठोर वचनी | अखंड तोले साभिमानी |
न्याय नीति अंतःकर्णीं | घेणार नाहीं ||३||

तर्‍हे सीघ्रकोपी सदा | कदापि न धरी मर्यादा |
राजकारण संवादा | मिळोंचि नेणें ||४||

ऐसें लौंद बेइमानी | कदापि सत्य नाहीं वचनीं |
पापी अपस्मार जनीं | राक्षेस जाणावें ||५||     

दहशतवाद्याच वर्णन करावं तस समर्थ रामदासांनी हे सगळं वर्णन केलेलं आहे, आणि त्या माणसाशीं राजकीय चर्चा नको.
No political Dialogue; राजकारण संवादा | मिळोंचि नेणें ||
दहशतवाद्यांशी राजकीय चर्चा करणार्‍या राज्यकर्त्यांनी समर्थ रामदासांच्या या वचनापासून बोध घ्यावा इतंक हे मौलिक वाचन आहे. उलट ते म्हणतात, 

समयासारिखा समयो येना | नेम सहसा चलेना |
नेम धरितां राजकारणा | अंतर पडे ||६||

अति सर्वत्र वर्जावें | प्रसंग पाहोन चालावें |
हटनिग्रहीं न पडावें | विवेकीं पुरुषें ||७||

बहुतचि करितां हट | तेथें येऊन पडेल तट |
कोणीयेकाचा सेवट | जाला पाहिजे ||८||

Kill him. त्याचा शेवट झालां पाहिजे. दहशतवादी चर्चा करण्याच्या योग्यतेचे नसतात, ते ठार मारण्याच्या योग्यतेचे असतात. खान आलेला आहे. पुन्हा अशी संधी मिळणार नाही. तू त्याला ठार मार. अस समर्थ रामदास या पत्रात स्पष्टपणें लिहितात. भगवान श्रीकृष्णांची राजनीतीची सूत्र या पत्रामध्ये आपल्याला पहायला मिळतात.

आता सांगा ह्या सगळ्या समर्थ रामदासांच्या काव्यावरुन सद्य समाजातील राज्यकर्त्यांनी काय बोध घेतला अथवा हे सर्व न वाचता, न पाहता आरोप-प्रत्यरोप करत आहेत. ह्या सर्वांची लायकी आहे का हे त्यांनी स्वत: तपासावे, कसाब सारखे कित्येक पाहुणे यांचाकडे असतील हे त्यांनाच माहित, परंतु आपण नागरिक हि झोपेत आहोत हे तितकेंच सत्य आहे...

जय जय रघुवीर समर्थ !!!

सौजन्य : समर्थभक्त सुनीलजी चिंचोलकर