Friday, May 13, 2011

श्लोक ७५, पहाटेच्या शांत वेळीं भगवंताच्या चिंतनाचा !


समस्तांमधें सार साचार आहे ।
कळेना तरी सर्व शोधून पाहें ॥
जिवा संशयो वाउगा तो त्यजावा ।
प्रभाते मनीं राम चिंतीत जावा ॥७५॥


समस्त = सर्व, सगळे, संपूर्ण. साचार = खरोखर, सत्य, वस्तुत:. संशय = संदेह, विकल्प, भय. वाऊगा = व्यर्थ, निरर्थक, मिथ्या.

खरोखर सर्व साधनांमध्ये नामस्मरण हें उत्कृष्ट साधन आहे. हें जर ध्यानांत येत नसेल तर श्रुति, स्मृति, पुराणें आणि संतांचे ग्रंथ नीट अभ्यासावे. नामाबद्दल येणारे निरर्थक विकल्प आपणहून सोडावे, अशा त्या भगवंताचे पहाटेच्या समयीं चिंतन करावें.

१) भगवंताच्या नामस्मरणांमध्यें पुढील तीन उत्तम लक्षणें आढळतात. (एक) नामाला कमीत कमी उपाधी आहे. (दोन) नामांत आरंभापासूनच भगवंताचें अस्तित्व असतें. (तीन) आणि नामाच्या अभ्यासांत इतर साधनांचें फळ आपोआप मिळतें.

२) नाम म्हणजे मी नाहीं. तो (भगवंत, आहे.) वेदशास्त्रपुराणें आणि संतांचे ग्रंथ या सर्वांमध्यें वरील अर्थ नाना प्रकारांनीं सांगितलेला आहे. म्हणून आध्यात्मिक वाड्:मयाचे परिशीलन करुन अखेर नामच हातीं लागतें.

३) संशय येणें हा जीवाचा स्वभाव आहे खरा. पण विवेकानें संशय – निदान निरर्थक संशय तरी - बाजूस सारल्यावांचून जीवाला नामस्मरणाचा आनंद भोगायला मिळणार नाहीं.

सौजन्य : सार्थ मनाचे श्लोक, के. वि. बेलसरे (बाबा)
॥ जय जय रघुवीर समर्थ ॥