Friday, June 29, 2012

॥ श्रीसमर्थकृत कलियुग पंचक ॥


॥ कलियुग पंचक ॥

आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥१॥
जैसा कली राजा झाला । धर्म अवघाचि बुडाला ॥२॥
नीतिमर्यादा उडाली । भक्ति देवाची बुडाली ॥३॥
दास म्हणे पाप जाले । पुण्य अवघेचि बुडाले ॥४॥

विप्री सांडिला आचार । क्षेत्री सांडिला विचार ॥१॥
मेघवृष्टी मंदावली । पिके भुमीने सांडिली ॥२॥
बहुवृष्टी अनावृष्टी । दास म्हणे केली सृष्टी ॥३॥
आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥

लोक दोष आचरती । तेणे दोषें भस्म होती ॥१॥
जनीं दोष जाले फार । तेणे होतसे संहार ॥२॥
रामदास म्हणे बळी । दिसेंदिस पाप कळी ॥३॥
आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥

नाही पापाचा कंटाळा । येतो हव्यास आगळा ॥१॥
जना सुबुद्धी नावडे । मन धावे पापाकडे ॥२॥
रामी रामदास म्हणे । पुण्य उणे पाप दुणे ॥३॥
आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥

पुण्यक्षेत्रे ती मोडावी । आणि ब्राह्मणे पीडावी ॥१॥
पुण्यवंत ते मरावे । पापी चिरंजीव व्हावे ॥२॥
रामदास म्हणे वाड । विघ्ने येती धर्माआड ॥३॥
आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥

लोक भेणेचि चालती । त्यास होताती विपत्ती ॥१॥
धर्मवृत्ती ते बुडावी । शास्त्रमर्यादा उडावी ॥२॥
रामदास म्हणे देवे । बौद्ध होऊन बैसावे ॥३॥
आलें भगवंताच्या मना । तेथे कोणाचे चालेना ॥

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥