Tuesday, April 19, 2011

हनुमंत, लेडीज रिसेप्शनिस्ट आणि नमस्कार ...


परम अन्याय करुनि आला । आणी साष्टांग नमस्कार घातला ।
तरी तो अन्याये क्षमा केला । पाहिजे श्रेष्ठीं ॥

रामायणातील सुग्रीवाचे एक उदाहरण पहा. सुग्रीव गादीवर बसला आहे. रामाने वाळिचा वध केला. आणि अस ठरल होतं की रामाने वालीचा वध करायचा आणि सुग्रीवाने सीतेचा शोध घ्यायचा. सगळे वानर पाठवायचे आणि रामाला त्या कामात मदत करायची. पण गादीवरती बसला आणि त्यानी रामाच कार्य जे आहे ते काहीं केल नाही. विसरुन गेला. इतका तो त्या सत्तेमध्ये, पैशामध्यें अडकून गेला. त्या रामानांच विसरला. रामचंद्रानीं लक्ष्मणाला सांगितल लक्ष्मणा सुग्रीवाला सांग कि, ‘ ज्या बाणाने मी वालीला ठार मारल असे अनेक बाण माझ्या भात्यात अजून आहेत. ’ लक्ष्मणाला बरेच दिवसांनतर आवडत काम मिळाल. झापाझापी. लक्ष्मण असां संतापला, लक्ष्मण निघाला. मूळ वाल्मिकी रामायणात त्याच वर्णन वाचण्यासारख आहे. लक्ष्मण असां तावातावान निघालेला आहे, लक्ष्मणाच्या रस्त्यात एखादी शिळा आली असेल तर लक्ष्मण नुसता लाथेने ती शिळा बाजुला करायचा. ती शिळा चक्काचूर होऊन जायची. एखाद झाड जर मध्ये आलं तर ते झाड उचलायचा आणि फेकून द्यायचा. असा तावातावान तो निघालेला आहे. हनुमंतानीं विचार केला, अशा अवस्थेंत जर हा सुग्रीवाच्या खोलीत शिरला आणि सुग्रीव आणि हे समोरा-समोर आलें, तर त्या दोघांमध्ये संवादच होणार नाहीत. लक्ष्मण पाहिल्या पाहिल्या पहिल्यांदा तलवार काढेल आणि त्या सुग्रीवाचे मुंडके कापेल, मग विचारेल ‘ सीतेचा शोध घेतो की नाहीं ? ’

इतका म्हटले हा चिडलेला आहे. याला शांत केल पाहिजे, कस शांत करणार. हनुमंतानीं युक्ति केली. हनुमंत म्हणजे ‘ बुध्दिमतां वरिष्ठम ’ हनुमंतानीं युक्ति केली, त्यांना माहिती होता लक्ष्मणाचा विक पॉईंट. तसेच हनुमंतानां हे माहित होते की कोणतीहि स्त्री पुरुषाचा राग शांत करु शकते.  स्त्री समोर आली की लक्ष्मण तिच्या कडे मान वर करुन पाहत नाहीं. लक्ष्मणाला जर ब्रेक लावायचा असेल तर त्यांनी काय केल वालीची पत्नी आणि सुग्रीवाची पत्नी या दोघीनां सांगितल की, तुम्ही लक्ष्मणाला रिसिव्ह करण्यसाठी इथ पुढें उभें राहां. म्हणूनच ही लेडीज रिसेप्शनिस्टची पध्दत हनुमंतानीं सुरु केली असावी. त्या सुग्रीवाच्या कांऊटंरपाशी दोघी उभ्या होत्या. असा संतापून आला होता लक्ष्मण, पण त्या वालीची पत्नी आणि सुग्रीवाची पत्नी या पाहिली आणि लक्ष्मण एकदम थांबला. आणि खाली मान घातली. मग त्यांनीं विचारल चहा आणू का, कॉफी आणू का, अमुक अमुक आणू का ?

मग तेवढ्यामध्यें हनुमंतानीं सुग्रीवाला सांगितल आधी जा आणि साष्टांग नमस्कार घाल आणि पाय धर !
सुग्रीव पुढे आलां आणि त्यानी पहिल्यांदा लक्ष्मणाचे पाय धरलें ! त्या नमस्कारा मुळे लक्ष्मण एवढा चिडलेला होता तो विरघळून गेला. निम्म काम त्या दोघींन केल, निम्म काम नमस्कारान झालं.

इति ..

श्रीसमर्थ भक्त सुनील चिंचोलकर - दासबोध प्रवचने.