Monday, April 4, 2011

एक कटाक्ष या गोष्टीकडे ....भाग - ४


श्रीराम समर्थ !!!

सन १६७४ साली गिरिधरस्वामींच्या डोळ्यादेखत घडलेल्या एका घटनेवरुन समर्थ रामदासांच्या हृदयाच्या विशालतेची आणि वैचारिक उत्तुंगतेची कल्पना येते. समर्थप्रताप या ग्रंथात ही कथा देताना 
गिरिधर म्हणतात कि,

“ एकदा रामनवमी-उत्सवात दत्ताजीपंत वाकेनिवीस यांच्याकडे जास्त दक्षिणा मिळेल म्हणून वैदिकांनी द्वादशीच्या पारण्याचे दिवशी चाफळला जाण्याचे ऐवजी ते दत्ताजीपंतांकडे गेले. समर्थांच्या उत्सवात ऐनवेळी त्यांची फजिती करावी ही त्या पाठीमागची भूमिका होती. परंतु समर्थांनी चाफळजवळील भोवरवाडी येथील येक सहस्त्र हरिजन दापत्यांस भोजनासाठी बोलाविले. त्या काळात ही मोठी क्रांती होती. समर्थांनी सर्व हरिजन दांपत्यांस मांड नदित स्नान करावयास सांगितले. स्त्रियांना चोळीलुगडी दिली. पुरुषांना धोतरें आणि उपरणी दिली. वैदिक दांपत्य म्हणून सगळ्यांची पूजा केली, आणि सर्वांना भोजन प्रसाद दिला. समर्थांना सर्व स्त्रिया सीतेची रुपे वाटत होत्या आणि सारे पुरुष रघुनाथ-स्वरुप वाटत होते. ह्या भोजनप्रसंगीच समर्थांनी आत्मारामाची पुढील आरती केली.

नाना देहीं देव एक विराजे ।
नाना नाटक लीला सुंदर रुप साजे ।
नाना तीर्थी क्षेत्रीं अभिनव गति माजे ।
अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे ॥१॥

जयदेव जयदेव आत्मयारामा ।
निगमागम शोधिता न कळे गुणसीमा ॥धृ॥

बहुरुपी बहुगूणी बहुता काळांचा ।
हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ।
युगानयुगी आत्माराम आमुचा ।
दास म्हणे न बोलवे वाचा ॥२॥

समर्थांना जाती, वर्ण, प्रांत, भाषा ह्यांवरुन परस्पर संघर्ष करीत राहाणे अथवा भेद करीत राहाणे मुळीच पसंत नव्हते. सर्वाभूती भगवद्भाव ही मानसीक अवस्था त्यांनी संपादिली होती. म्हणून शिष्याला रामनामाची दीक्षा देताना समर्थ म्हणत –

चहुं वर्णां नामाधिकार । नामीं नाहीं लाहानथोर ।
जढ मूढ पैलपार । पावती नामें ॥

परमार्थाचे दालन सर्वांसाठी सारखे खुले आहे ही वैचारिक उदारता त्यांनी ज्याप्रमाणे अन्य जातीच्या शिष्यांबद्दल दाखविली, त्याचप्रमाणे स्त्रियांबाबतही दाखविली. समर्थांनी ज्यांना अनुग्रह दिला होता अशा सुमारे चाळीस स्त्रियांची नावे गिरिधरांनी समर्थ-प्रतापात दिली आहेत. त्यांतील अनेक विधवा होत्या. बाईयाबाई तर परित्यक्ता होत्या. मिरज-मठाच्या मठपती वेणाबाई, राशिवडे-मठाच्या मठपती अंबिकाबाई, सज्जनगडच्या मठ्पती अक्काबाई ह्या तर विधवा होत्या. स्त्रियांना अतिशय सन्मानाने वागविले गेले पाहिजे असे समर्थांचे प्रामाणिक मत होते. अक्काबाई व वेणाबाई या विधवा रामरायाला नैवेद्य दाखवित असत आणि त्यांच्या पाकसिध्दीचा समर्थ समाचारही घेत असत. आज समर्थसंप्रदायात सोवळ्या-ओवळ्याचे जे स्तोम माजले आहे अथवा जे कर्मकांड बोकाळले आहे ते समर्थांच्या शिकवणुकीनुसार नसून काही भोजनभाऊ शिष्यांनी हे सारे समर्थांवर लादले आहे. ह्या मंडळींनी समर्थसंप्रदाय खेड्यापाड्यांत कधीही पोहोचू दिला नाही. यांनी दासबोध ग्रंथ बासनात बांधून ठेवला आणि गंध, फुले वाहून केवळ स्तवन आरंभिले. पण समर्थच विचारतात –

ग्रंथाचें करावेंस्तवन । स्तवनाचें काये प्रयोजन ।
येथें प्रत्ययास कारण । प्रत्ययो पाहावा ॥

वीस दशक दोनीसें समास । साधकें पाहावें सावकास ।
विवरतां विशेषाविशेष । कळों लागे ॥

कै. शंकर श्रीकृष्ण देव यांच्या परखड शव्दांत सांगावयाचे झाल्यास –

“समर्थसंप्रदायावरती काही इतर संप्रदायाचे आज आक्रमण झाले आहे. त्यामुळे समर्थसंप्रदायाची आजची स्थिती पाहून माझे मन भांबावते. समर्थांना अभिप्रेत असलेला समर्थसंप्रदाय हा मुळीच नव्हे असे नाईलाजाने म्हणावे लागते.”

समर्थभक्त - सुनील चिंचोलकर