Wednesday, March 23, 2011

आकाश आणि समुद्र यांची भेट ...



अली आदिलशहाने शहाजीराजांना नुसती अटकच केली नाही तर शिवाजीमहाराजांना पत्र पाठवून विचारणा केली -
काय हवंय तुम्हाला ? आईचे सौभाग्य, की स्वराज्य ? शिवरायांनी हिंदवी स्वराज्याच्या संस्थापनेला तीन चार वर्षांपूर्वीच प्रारंभ केला होता आणि स्वराज्यावर हे विघ्न आले. तेव्हा शिवाजी महाराजांना वाटले की, आपल्या कार्याला भगवंताचे अधिष्ठान असावे. हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे हे तो खरेच खरेच, पण त्यास साधुसंतांचे आशीर्वाद लाभावेत. महाराज पुण्यात होते. जवळच देहू गावी संत तुकाराम यांचे वास्तव्य होते. त्यांची अमृतवाहिनी अभंगवाणी शिवरायांनी ऐकली होती –

बुडते हे जन देखवेना डोळा ।
म्हणोनि कळवळा येतो आम्हां ॥
तख्तावरती बैसोनिया अन्नाविण पिडीती लोकां
तुका म्हणे आता धावा काय निद्रा केली देवा ॥

तुकोबांचा हा धावा व त्यात दडपलेली जनकल्याणाची आस शिवराय जाणून होते. राजे देहूला गेले आणि त्यांनी तुकाराममहाराजांना अनुग्रह देण्याची विनंती केली. तुकाराममहाराजांचा अंतकाळ समीप आला होता. त्यामुळे त्यांनी महाराजांना सांगितले,

राया छत्रपती । ऎकावे वचन । रामदासी मन । लावी वेगी ॥ १ ॥
रामदास स्वामी । सोयरा सज्जन । त्यासी तनमन । अर्पी बापा ॥ २ ॥
मारुति अवतार । स्वामी प्रगटला । उपदेश केला । तुजलागी ॥ ३ ॥

आणि शिवरायांना चाफळला जाण्यास सांगितले. पंढरपूर येथे समर्थ आणि तुकोबा यांची भेट झाली होती. दोघांचे परस्परावर अतिशय प्रेम होते. म्हणूनच मनाचा मोठेपणा दाखवून तुकाराम महाराजांनी शिवरायांना रामदासांचे नाव सुचवले. दुर्दैवाने या भेटीनंतर दीडच वर्षात म्हणजे १६५० सालच्या फेब्रुवारी महिन्यात तुकोबा सदेह वैकुंठाला गेले. शिवाजी महाराजांनी तुकोबांचे दर्शन घेतले आणि ते वाई परगण्यात आले. शिवाजी महाराजांच्या भेटीची ओढ समर्थांनादेखील लागली होती. त्यांचे शिष्य भिक्षेच्या निमित्ताने संचार करीत असताना शिवछत्रपतींच्या सर्व हालचाली समर्थांच्या कानावर येत असत. छत्रपतींची छावणी वाईला असताना, समर्थांनी दिवाकर गोसावी आणि उध्दव गोसावी ह्यांना शिवरायांकडे पाठविले. दोघेजण वाईला पोहोचले. त्यांनी समर्थांचे पत्र शिवाजी राजांना दिले. छत्रपती वाचू लागले –

लिखित
॥ श्री गणेशाय नमः ॥
निष्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू} । श्रीमंत योगी ॥१॥

परोपकाराचिया रासी । उदंड घडती जयासी ।
तया गुण महत्वासी । तुळणा कैंची ॥२॥

नरपति हयपति गजपति । गडपति भूपति जळपति ।
पुरंदर आणि शक्ति । पृष्ठभागी ॥३॥

यशवंत कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवंत नीतिवंत । जाणता राजा ॥४॥

आचारशील विचारशील । दानशील धर्मशील ।
सर्वज्ञपणे सुशील । सकळा ठायीं ॥५॥

धीर उदार गंभीर । शूर क्रियेसि तत्पर ।
सावधपणे नृपवर । तुच्छ केले ॥६॥

तीर्थें क्षेत्रें तें मोडलीं । ब्राह्मणें स्थानभ्रष्ट जालीं ।
सकळ पृथ्वी आंदोळली । धर्म गेला ॥७॥

देव धर्म गोब्राम्हण । करावया संरक्षण ।
हृदयस्थ झाला नारायण । प्रेरणा केली ॥८॥

शूर पंडित पुराणिक । कवेश्वर वैदिक याज्ञिक ।
धूर्त तार्किक सभानायेक । तुमचा ठाई ॥९॥

या भूमंडळचे ठायी । धर्मरक्षी ऐसा नाही ।
महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा कारणे ॥१०॥

आणीक हि धर्मकृत्यें चालती । आश्रित होऊनी कितेक असती ।
धन्य धन्य तुमची कीर्ति । विश्वीं विस्तारली ॥११॥

कित्येक दुष्ट संहारिला । कित्येकांसि धाक सुटला ।
कित्येकांस आश्रयो जाहला । शिवकल्याणराजा ॥१२॥

तुमचे देसीं वास्तव्य केलें परंतु वर्तमान नाहीं घेतलें ॥१३॥
सर्वज्ञ मंडळी धर्ममूर्ती । सांगणे काये तयांप्रती ।

धर्म स्थापनेची कीर्ति । सांभाळिली पाहिजे ॥१४॥
राजकारण उदंड दाटले । तेणें चीत विभागलें ।

प्रसंग नस्तां लिहिलें । क्षमा केलें पाहिजे ॥१५॥
इति लिखित नाम समास ॥१॥

महाराजांनी पत्र वाचले. मस्तकी धारण केले आणि दिवाकरास म्हणाले, - चला तत्काळ निघायचे. पंत, या दोघांची फराळाची व्यवस्था करा आणि आमचेबरोबर तीनशे स्वारांची व्यवस्था करा.

दिवाकर आणि उध्दव ह्यांनी फराळ केला. तीनशे घोडेस्वार चाफळच्या दिशेने धावू लागले. चाफळच्या कारभारी श्रीमंत अक्कास्वामी ह्यांनी सर्वांचे स्वागत केले. समर्थ शिंगणवाडीच्या बागेत आहेत असे समजले तेव्हा शिवाजी महाराज तत्काळ शिंगणवाडीला जायचे म्हणत होते. तेव्हा अक्काबाई नम्रपणे म्हणाल्या – रामरायाचे दर्शन घ्या राजे, मग रामरायाचा प्रसाद घ्या. प्रसाद घेतल्याविण तुम्हांस बागेत पाठविले तो स्वामी मजला रागेजोन भरतील. तो दिवस होता वैशाख शुध्द नवमी. गुरुवार दिनांक १२ एप्रिल १६४९. प्रभू रामचंद्राचे दर्शन आणि प्रसाद घेऊन महाराज शिंगणवाडीच्या दिशेने निघाले. बरोबर दिवाकर आणि उध्दव होतेच. समर्थ आंब्याच्या झाडाखाली बसले होते व त्यांच्या सूचनेनुसार कल्याणस्वामी ग्रंथलेखन करीत होते. शिवाजीराजे बागेत पोहोचले. समर्थ आपल्या आसनावरून उठले आणि अत्यंत प्रेमाने त्यांनी राजांचे स्वागत केले. शिवाजी महाराज समर्थांना नमस्कार करण्यासाठी खाली वाकणार तेवढ्यात त्यांचे दोन्ही दंड धरुन समर्थांनी त्यांना प्रेमाने मिठी मारली आणि ते म्हणाले -

तुम्ही आम्हाला नमस्कार नाही करायचा. तुम्ही आमचे बंधूच. आपण दोघे तुळजाभवानीचे पुत्र. तुम्ही ईश्वराचे अवतार. धर्मसंस्थापनेसाठीच रामाने तुम्हांस धाडीले.

तेव्हा शिवाजी महाराज म्हणाले, - स्वामी, तुम्ही आमच्यापेक्षा बावीस वर्षांनी वडील आहांत. तेव्हा धाकट्या भावाने थोरल्या भावास वाकून नमस्कार करु नये हा कोण्या मुलुखाचा कायदा ?

राजांनी समर्थांना वाकून नमस्कार केला. समर्थांनी त्यांना पुन्हा हृदयाशी धरले. साक्षीला होता शिंगणवाडीचा मारुती. शिवाजी आणि समर्थ रामदास ह्यांची भेट म्हणजे हवा आणि सूर्यप्रकाश ह्यांचे मीलन. शिवसमर्थ भेट म्हणजे गंगा आणि यमुना ह्यांचा संगम. दोघांची शरिरे भिन्न होती पण आत्मा मात्र एकच होता. समर्थ संन्यासी होते. पण योध्दा-संन्यासी होते. शिवाजीराजे योध्दा होते पण संन्यस्त योध्दा होते. हे दोघे एकत्रित आले आणि त्यायोगे धर्मकारण आणि राजकारण ह्यांचा सुमुधुर समन्वय महाराष्ट्राच्या इतिहासात घडला. विक्रम आणि वैराग्य एकमेकांस कडकडून भेटले. जणू याज्ञवल्क्य आणि जनक ह्यांची भेटच ! नव्हे, कृष्ण आणि अर्जून ह्यांचीच भेट ! अं हं ! ही भेट श्रीराम आणि वसिष्ठ ह्यांचीच. ही भेट,

भगवद्गीता अस म्हणते,
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥ 
परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम । धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥

आणि याच भगवदगीतेच्या श्लोकाचा जणू भावार्थ करताना श्रीसमर्थ म्हणतात,

धर्मस्थापनेचे नर । ते ईश्वराचे अवतार ।
 जाले आहेत पुढें होणार । देणें ईश्वराचें ॥

या गीतेतील श्लोकाचा सगुण अवतार होय. उभा महाराष्ट्र स्तिमित होऊन ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज ह्यांचे हे मीलन पाहात होता. विवेकसत्ता आणि राजसत्ता जणू हातांत हात घालून चालत होत्या आणि आपल्या पाउलखुणा भावी इतिहासासाठी ठेवत होत्या. ह्या पाउलखुणा म्हणजे -

सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें ।
परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ॥

छत्रपती शिवाजी महाराज ही सामर्थ्याची प्रचंड चळवळ होती आणि समर्थ रामदास हे त्या चळवळीला लाभलेले भगवंताचे अधिष्ठान होते.

इति ...सरते शेवटी आजची वाद-विवाद, अकलेचे तारे तोडणार्‍याच्यां स्पर्धेवर समर्थांचेच हे उत्तर ...

सत्य कळावयाकारणें | बोलिलीं नाना निरूपणें
तरी उठेना धरणें । असत्याचें ॥ ”

श्रीराम