Thursday, May 8, 2014

दासबोधातुन निवडणुक बोध...

सर्वांना जय रघुवीर,

आपण पहातो आहोत सध्या २०१४ च्या लोकसभा निवडणुक अंतिम टप्प्यात आहे. अनेक पक्ष आहेत अनेक उमेदवार आहेत आणि सगळ्यांचाच असा दावा आहे की आम्हाला देशाचा विकास करायचा आहे. असो नुसतात दावा करुन उपयोग नाही तर त्यासाठी दोन राजकीय पक्षांना एकत्र आणणारा दुवा पाहिजे. तसेच देशाचा विकास करायचाच आहे तर मग समान ध्येय असणार्‍या मंडळींच्या वाटा वेगवेगळ्या का ? ह्याच उत्तर हेच की देशाच्या विकासाचे नाव घेऊन कोणी जाती-पातीचा, वैयक्तिक पक्षाचा-राज्याचा विकास पहात आहे. 

जेव्हा एखाद्या पक्षाचे ध्येय ठरलेले असताना देखील मार्ग भरकटतो, लक्ष विचलीत होते. पक्षार्तंगत देखील अनेक गोष्टी असतात, समर्थक नाराज होणे, विरोध होणे परंतु यावर समर्थ रामदास दासबोधात सांगतात,

अचुक येत्न करवेना । म्हणौन केलें तें सजेना ।
आपला अवगुण जाणवेना । कांहीं केल्यां ॥

एकतर आपले ध्येय निश्चित नसते, ते पुर्ण करण्यासाठी जो आवश्यक प्रयत्न असतो तसा होत नाही म्हणून घेतलेल्या कार्यात अपेक्षित यश येत नाही तसेच आपल्यातले दोष स्वतःला तर दिसत नसतात त्यातून कोणी एकाने आपल्याला सांगितलेच तर आपण त्याला नावे ठेवतो.

जो आपला आपण नेणे । तो दुसऱ्याचें काये जाणे ॥
न्याये सांडितां दैन्यवाणे । होती लोक ॥

जेव्हा एखाद्या पक्षाचे, राष्ट्राचे नेतृत्व करत असतो तेव्हा स्वत:चीच नीट परीक्षा करण्याची क्षमता नसते त्यात आपण देशातील नागरिकांचे अंतरंग काय जाणुन घेणार. प्रयत्न जसा अचूक असायला हवा तसेच ध्येयपुर्तीचा मार्ग देखील नियमानां धरुन व न्यायाचा असावा नाहितर कायदेशीर कारवाईला सामोरे जाऊन अनेक गोष्टी सोसाव्या लागतात. 

लोकांचे मनोगत कळेना । लोकांसारिखें वर्तवेना ।
मूर्खपणें लोकीं नाना । कळह उठती ॥

वैयक्तिक पातळीवर जेव्हा प्रचार करत असतो तेव्हा प्रथम देशाच्या नागरिकांचेच मनोगत जाणून न घेता त्यांच्या सामान्य गरजा लक्षात येत नाहीत यामुळे अनेक मतभेद होऊन संघर्ष उभे राहतात. विरोधकाचें पारडे जड होते. 

मग ते कळो वाढती । परस्परें कष्टी होती ।
प्रेत्न राहातां अंतीं । श्रमचि होयें ॥

दोन राजकीय पक्षांमधील आणि जनतेतील संघर्ष वाढले की एकमेकांची उणी-दुणी, दोष काढत काढत एकमेकांना यातना देण्या पलीकडे कामच उरत नाही व ध्येयपुर्तीचे प्रयत्न एका बाजूस राहतात आणि केवळ आरोप-प्रत्यारोपातच सर्व विनाकारण कष्ट होतात.

ऐसी नव्हे वर्तणुक । परिक्षावे नाना लोक ।
समजलें पाहिजे नेमक । ज्याचें त्यापरी ॥

जेव्हा देशाचे नेतृत्व करत असतो तेव्हा दोन राजकीय पक्षाना असे वागून चालत नाही, देशाच्या जनतेचे एक काम असते की सर्व नेत्यांची परिक्षा घेणे आणि सर्वात मुख्य म्हणजे पक्षातील ज्या ज्या कार्यकर्त्याला उमेदवारी देण्यात येणार असते त्याची पारख अचूक असावी, जशास तसे वागता आले पाहिजे. 

शब्द परीक्षा अंतरपरीक्षा । कांहीं येक कळे दक्षा ।
मनोगत नतद्रक्षा । काय कळे ॥

मुळातच जेव्हा एखादा पक्ष कोण्या एक व्यक्तीला देशाचे नेतृत्व करण्याची संधी देत असतो तेव्हा जाणकारांनी त्याच्या बोलण्यावरून व हालचालींवरून त्याची अंतरपरिक्षा करण्याचे कसब, चाणाक्ष त्या व्यक्तीजवळ असावी. अर्थात विचाराचीं दृष्टी गमावून बसलेल्याला देशाच्या प्रगतीच्या वाटा काय कळणार

दुसऱ्यास शब्द ठेवणें । आपला कैपक्ष घेणें ।
पाहों जातां लोकिक लक्षणें । बहुतेक ऐसीं ॥

देशाचे नेतृत्व करण्याचे ध्येय, देशाचा विकासाचा प्रश्न ऐरणीवर असताना राजकीय पक्षातील नेते मंडळी एकमेकांना दोष देऊन स्वतःच्या वागाण्याचे समर्थन करण्याचा जो प्रकार करतात तो जगात बहुतेक सर्वांकडेच असतो.

लोकीं बरें म्हणायाकारणें । भल्यास लागतें सोसणें ।
न सोसितां भंडवाणें । सहजचि होये ॥

देशाचे भलेच करायचे आहे, विकासच करायचा आहे अशा व्यक्तीला समाजाचेच तसेच विरोधकांचे पुष्कळ ऐकावे लागते, जनतेच्या विकासासाठी झीज सोसली पाहिजे नाही तर फजिती झाल्यावाचून राहात नाही.

आपणास जें मानेना । तेथें कदापि राहावेना ।
उरी तोडून जावेना । कोणीयेकें ॥

दोन विरोधी पक्ष म्हटले की एकमेकांचे पटेलच हे निश्चीत नसते अशा वेळी जी व्यक्ती आपल्या विकासाच्या धोरणावर ठाम असते तिला तेथे थांबणेही कठीण होते आणि चर्चा एकदम सोडून निघुनही जाता येत नाही.  

बोलतो खरें चालतो खरें । त्यास मानिती लहानथोरें ।
न्याये अन्याये परस्परें । सहजचि कळे ॥

जी व्यक्ती विकासाच्या, देशाच्या हिताच्या बाबतीत योग्य ते बोलतो आणि स्वत: तसे वागतो त्या व्यक्तीस स्वाभाविक देशातील सर्व थरातील लोक मान देतात. देशाचे नागरिक सुजाण असुन न्याय व अन्याय ह्यांचा निवाडा समाज अगदी सहजपणाने करेल. कोण कोणाचा विकास करणार हे सर्वश्रुत असते.

जंव उत्तम गुण न कळे । तों या जनास काये कळे ।
उत्तम गुण देखतां निवळे । जगदांतर ॥

मुळातच आपल्यात उत्तम गुण आहेत हे जनतेला कळले पाहिजे आणि त्यांचा वापर देशाच्या विकासार्थ करून, देशातील जनतेसमोर प्रगट झाले पाहिजे. सगळ्याचा अनुभव आला की त्या व्यक्ती विषयक संशय दुर होतो. तसेच जनतेचे त्या व्यक्ती विषयी मत परिवर्तन होते.

जगदांतर निवळत गेलें । जगदांतरी सख्य जालें ।
मग जाणावें वोळले । विश्वजन ॥

देशाच्या विकासाची, सशक्तीकरणाची अनुभुती जेव्हा देशातील जनतेला दिसते तेव्हा देशभरात त्या व्यक्तीला अनुकूलता मिळते, लोकमत बदलत जाऊन स्वच्छ झाले म्हणजे आपल्यावरचे लोकांचे प्रेंअ वाढते. आणि देशवासीयांना आपलासा वाटु लागते आणि बाहेर देशांत ही चांगले परिणाम दिसतात.

जनींजनार्दन वोळला । तरी काये उणें तयाला ।
राजी राखावें सकळांला । कठीण आहे ॥

देशाच्या जनतेते ज्याला प्रचंड बहुमताने निवडुन दिलेले आहे ती जनता जनार्दन त्याला विकास कार्य करण्यासाठी उर्जा देत असते, परंतु आपल्याला पाठिंबा देणार्‍या सर्वांची मने सांभाळुन सर्वांना खुष, आनंदी ठेवावे लागते जे परम कठिण आहे.

पेरिलें तें उगवतें । उसिणें द्यावें घ्यावें लागतें ।
वर्म काढितां भंगतें । परांतर ॥

निवडणुक प्रचारा दरम्यान आपण जाहिरनामे, घोषणापत्र किंवा प्रचार सभा अनेक माध्यमांचा आधार घेतो पण जे आश्वासन आपण देशाच्या नागरिकांना, जनतेला देत असतो तसेच करावे लागते, ते सोडुन उणीदुणी काढली तर देशाचा नागरिक दुखावला जातो.

लोकीकीं बरेपण केलें । तेणें सौख्य वाढलें ।
उत्तरासारिखें आलें । प्रत्योत्तर ॥

खरोखरच देशाचा विकास आणि आश्वासन पुर्ती केली तर त्या व्यक्तीचे आणि जनतेचे जीवन सुखाचे होते. स्वाभाविक आहे आपण देशाच्या जनतेशी जसे वागू तसेच देशाची जनता आपल्याला प्रतिसाद देणार. उलट उत्तरांचे उत्तर उलटच येते.

हें आवघें आपणांपासीं । येथें बोल नाहीं जनासी ।
सिकवावें आपल्या मनासी । क्षणक्षणा ॥

आपणच आपल्या मनाशी पक्के करायचे आहे की देशाचा, जनतेचा विकास की जनतेचा रोष. देशाच्या जनतेला आणि विरोधकांना दोष देण्यात अर्थ नसतो. आपण आपल्या मनाशी एकनिष्ठ राहुन, मनाला सतत सांगावे की कोणत्याही परिस्थीतीत मार्ग,ध्येय बदणार नाही.

खळ दुर्जन भेटला । क्षमेचा धीर बुडाला ।
तरी मोनेंचि स्थळत्याग केला । पाहिजे साधकें ॥

जो देशाशी व जनतेशी प्रामाणिक असतो त्याची विरोधकांशी गाठ पडल्यावर त्याच्या वक्तव्याने आपणास त्रास झाला तरी आपला शांततेचा भंग न करता काम झाल्यावर तेथुन निघून जाणे उचित असते.

लोक नाना परीक्षा जाणती । अंतरपरीक्षा नेणती ।
तेणें प्राणी करंटे होती । संदेह नाहीं ॥

देशाची जनतेमधील काही जण, विरोधक जेव्हा केवळ बहिरंगावरून त्या व्यक्तीची परीक्षा करण्य़ाचा प्रयत्न करून अंतरंगात झाकून न पहाता विश्वास ठेवतात तेव्हा ते निसंदेह करंटे होतात. 

आपणास आहे मरण । म्हणौन राखावें बरेंपण ।
कठिण आहे लक्षण । विवेकाचें ॥

आपलाही एक दिवस शेवट होणार आहे ह्याचे स्मरण ठेवून देशातील जनतेशी जेवढा चांगुलपणा सांभाळण्याचा प्रयत्न करू तितके पहावे. विवेकाने सांभाळून राहाणे मोठे कठिण आहे.

थोर लाहान समान । आपले पारिखे सकळ जन ।
चढतें वाढतें सनेधान । करितां बरें ॥

जेव्हा देशाच्या विकासाचे मुद्दे आपण मांडत असतो तेव्हा देशाच्या जनतेत श्रीमंत, गरीब, परिचयाचे, अनोळखी अशा सर्वांशी एकसारखे वागावे, पक्षपात नसावा. देशाच्या नागरिकांशी अधिक प्रेमाचे संबध वाढवणे चांगले असते.

बरें करितां बरें होतें । हें तों प्रत्ययास येतें ।
आतां पुढें सांगावें तें । कोणास काये ॥

देशात निवडणुकीची रणधुमाळी येण्यापुर्वीच त्या व्यक्तीने देशाच्या, जनतेच्या विकासाच्या दृष्टीने पायाभरणी अगोदरच केली असेल तर निकाल त्याच्या बाजूने लागतो हा सर्वांचा अनुभव आहे. शहाण्या व्यक्तींना आणखीन काय सांगावे.

हरिकथानिरूपण । बरेपणें राजकारण ।
प्रसंग पाहिल्याविण । सकळ खोटें ॥

आपल्या भारतभुमीत प्रभु श्रीरामांसारखा अयोध्येचा राजा झाला, छत्रपती शिवरायांसारखा जाणता राजा होऊन गेला त्यांचे आदर्श घेऊन, स्मरण करुनच त्यांच्याप्रमाणे जनतेतल्या सर्व वर्गातील लोकांचे हित लक्षात ठेवून नेमस्त राजकारण करावे. प्रसंग आणि काळ न पहाता एखाचे कार्य राहून गेले तर अपयशास निमंत्रण असते.

विद्या उदंडचि सिकला । प्रसंगमान चुकतचि गेला ।
तरी मग तये विद्येला । कोण पुसे ॥

त्या व्यक्ती उच्च-शिक्षीत असेल आणि अनुभवी असेल आणि त्या शिक्षणाचा, अनुभवाचा देशाच्या विकासार्थ उपयोग न करता, उत्पन्न झालेल्या प्रश्नाशी सुसंगत प्रतिक्रीया देण्यास असमर्थ ठरला तर त्याच्या शिक्षणाचा, अनुभवाचा उपयोग काय. सर्व ज्ञान व्यर्थच आहे.

(द. १२, स. २)