Tuesday, March 1, 2011

समर्थांचीं काव्यसृष्टी - भाग १



॥ श्रीराम समर्थ ॥

श्री समर्थ रामदास स्वामी भारतभर प्रवास करत आहेत. प्रवास संपत आलेला होता. समर्थ रामदास स्वामी पैठण ला आलेले आहेत. पैठण हे एका अर्थाने समर्थ रामदासांचे आजोळ. समर्थ रामदास स्वामींची आई आणि नाथांची पत्नी गिरिजाबाई या दोघी सख्या मावस बहिणी. समर्थ रामदासांचा जन्म झाला. त्या चार - सहा महिन्यांचा मुलगा नाथांच्या मांडीवर ठेवला गेला होता. माझ धर्म संस्थापनेच कार्य हा मुलगा पुढे चालु ठेवील. हा नाथांचा आशिर्वाद या बालकाला त्यांच्या मांडीवर बसलेला असतानाच मिळाला होता. नाथ गेले होते. समर्थ रामदास स्वामी भारतभ्रमण संपल्यानंतर मुद्दाम पैठण ला आले. लहानपणापासून विश्वाची चिंता लागलेली आहे. समाज बदलला पाहिजे, लोक सुखी झाले पाहिजेत. समर्थांच्या सहवासात दहा वर्ष राहिलेले गिरीधर महाराज त्यांच्या समर्थ प्रताप या ग्रंथात लिहितात,

समर्थ सदगुरु एकांती बैसती । प्रांतीचे लोक दर्शनास येती ।
सकळ प्रांताचा परामर्श घेती । चिंता करीती विश्वाची ॥

कैची देव देवालये तगती । कैसे कुटुंब वत्सल लोक जगती ।
कैसे क्षेम राहिले जगती । कोणीकडे जातील हे ॥

या लोकांच काय होणार, या कुटुंबांच काय होणार, या समाजच काय होणार, चिंतेने उर फाटतो...
या चिंतेतन हृदयातल रक्त सांडत सांडत हिमालयापासून - कन्याकुमारी पर्यंत हा महापुरुष सगळीकडे फिरत राहिला. आणि सगळ्या देव-देवतांना एकच साकड घालत राहिला.
तुळजाभवानीकडे आले, देवीला म्हणाले,

दुष्ट संहारिले मागे । ऐसे उदंड ऐकिले ।
परंतु रोकडे कांहीं । मुळ सामर्थ्य दाखवी ॥

तुझा तू वाढवी राजा । शिघ्र आम्हाची देखता ।
मागणे एकची आतां । द्यावे ते मज कारणें ॥

रामदास म्हणे माझें । सारे आतुर बोलणें ।
क्षमावे तुळजा मातें । इच्छा पूर्णचि तू करीं ॥

भगवंताच्या हातात शस्त्र नाहीं, हि कल्पना समर्थांना मानवत नाही, जागोजागी हनुमंताची मंदिर उभी केलेली आहेत, वीर हनुमान आहे. तुळजाभवानीची मंदिर उभी केलेली आहेत. हातात त्रिशूळ आहे आणि महिषासुराच मस्तक तिने तोडलेल आहे. पांडुरंगाला जेव्हा कमरेवर हात ठेवून उभं पाहिलं, तेंव्हा समर्थ अस्वस्थ झाले.

येथे उभा का श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥
काय केले चापबाण । कर कटेवरी ठेवून ॥
काय केले वानरदळ । इथे जमविले गोपाळ ॥
काय केली अयोध्यापुरी । इथे वसविली पंढरी ॥
काय केली सीतामाई । उभि राही रखुमाई ॥

शेवटी ते म्हणतात, त्याठिकाणी त्यांनी हनुमंताला आलेलं पाहिलं. कारण आपण नामदेवांच्या आरतीत पाहतो, गरुड हनुमंत पुढे उभे राहती. विठ्ठलासमोर हनुमंताला
पाहिल्यावर समर्थ प्रश्न विचारतात,

का हनुमंत एकला । का पक्षामधुनी फुटला ॥

हनुमंत कसा एकता आला, बाकीचे गेले कुठे, समर्थांच्या अंत:करणांत कशा प्रकारच वादळ चालल असेल. त्यांच्या अंत:करणातील वादळाचा अविष्कार या काव्यसृष्टीमध्ये आपल्याला बघायला मिळतो. म्हणून ते जेंव्हा आले परशुरामाकडे चिपळूण ला, त्या परशुरामाला त्यांनी प्रश्न केला,

किति वेळ मागे तुंवा युद्ध केले ।
किति वेळ आम्हासि तू राज्य दिल्हे ।
अकस्मात सामर्थ्य तें काय झालें ।
युगासारिखे काय नेणोनि जालें ॥

तुझ सामर्थ्य गेल कुठे, समर्थांच्या मनामध्ये सशस्त्र क्रांतीचा विचार कस घर करून बसला होता हे या सगळ्या काव्यांतून दिसून येत. हि सगळी तळमळ जी आहे, शांत झाली, शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने. ६ जून १६७४, जेष्ठ शुद्ध त्रयोदशी यादिवशी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ठरला होता. त्यावेळेस समर्थांनी केलेलं जेम अद्भुत काव्य आहे, आनंदवनभूवनी या नावाने तें प्रसिद्ध ओळखल जात. समर्थ रामदास स्वामी  तुळजाभवानीच्या पूजेला प्रतापगडावरती आलेत. असं ठरलं होत, ज्या ३६० किल्ल्यांवरती शिवाजी महाराजांची राजवट आहे, त्या ३६० किल्ल्यांवरती राज्याभिषेकाच्या वेळेला पहाटे ५.०० वाजून ४० मिनिटांनी तोफांच्या तीन सलाम्या द्यायच्या. किल्लेदाराने जी पदवी शिवाजी महाराजांनी घेतलेली आहे, त्या पदवीचा जयघोष करायचा, समर्थ रामदास गिरीधर स्वामींच्या बरोबर प्रतापगडावर आलेले आहेत. त्यांनी पहाटे ४.०० वाजता तुळजाभवानीची पूजा केलेली आहे. तुळजाभवानीला नवस बोलले होते. तुझा तू वाढवी राजा  शिघ्र आम्हाचि देखतां तो नवस पूर्ण केला, सोन्याचे फूल देवीला अर्पण केलं आणि त्यानंतर ५.४० मिनिटे केव्हा होतील याची वाट समर्थ रामदास पाहत होते. ३५० वर्षांच्या काळ्या किभिन्न अमावस्येनंतर स्वातंत्र्याचा तो सूर्य उदित झाला. आणि शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने अनेकांच्या जखमा भरून निघाल्या. तोफांची सलामी झाली, किल्लेदाराने गर्जना केली.

महाराज....सिंहासनाधिश्वर....प्रौढप्रताप पुरंदर.... सेनाधुरंदर.... क्षत्रियकुलावंतस....राजा शिवछत्रपती महाराज  
राज्याभिषेकाची ती गर्जना ऐकली.
समर्थांचं अंत:करण आनंदाने भरून आल, ते गिरीधरांना म्हणतात मला काव्यस्फुर्ती होते आहे, मी सांगतो, तू लिही.  समर्थ सांगू लागले, गिरीधर लिहुं लागले.
समर्थ बोलुं लागले,

स्वप्नी जे देखिले रात्री ।  ते ते तैसेचि होतसे ।
हिंडता फिरता गेलो । आनंदवनभूवनी ॥

विघ्नांच्या उठिल्या फौजा ।  भीम त्यावरी लोटला ।
घर्डिली, चिर्डिली रागे  ।  आनंदवनभूवनी ॥

खौळले लोक देवांचे  ।  मुख्य देवचि उठिला  ।
कळेना काय रे होते  । आनंदवनभूवनी ॥

बुडाले सर्वही पापी  ।  हिंदुस्थान बळावले ।
अभक्तांचा क्षयो झाला ।  आनंदवनभूवनी ॥

त्रैलोक्य गांजिले मागे  । विवेकी ठाउके जना ।
कैपक्ष घेतला रामे  । आनंदवनभूवनी ॥

बुडाला औरंग्या पापी ।  म्लेंच्छ संहार जाहला ।
मोडिली मांडिली क्षेत्रे  ।  आनंदवनभूवनी ॥

उदंड जाहले पाणी  । स्नान संध्या करावया ।
जप-तप-अनुष्ठाने  । आनंदवनभूवनी ॥

रामवरदायिनी माता ।  गर्द घेउनी ऊठिली ।
मर्दिले पूर्वीचे पापी  ।  आनंदवनभूवनी ॥

भक्तांसि रक्षिले मागे  ।  आताहि रक्षिते पहा ।
भक्तांसि दीधले सर्व । आनंदवनभूवनी ॥
  
वनभुवनी काशीच पौराणिक नाव आहे. स. न १६३४ साली समर्थ काशीला होते. हनुमान घाटावर झोपले होते. त्यांना पहाटे स्वप्न पडल कि, महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक होतो आहे, हिंदुंच सिंहासन निर्माण होत आहे. त्या स्वप्नान त्याचं अंत:करण भरून आल, आज ४० वर्षानंतर ते स्वप्न खर होत होत. तें स्वप्न खर होत असल्याचा आनंद मिळत होता. म्हणून आनंदवनभूवनी अस त्या काव्याच नाव दिलेलं आहे. आनंदवनभूवनी ....

सबंध समर्थांच्या काव्यसृष्टीच्या पाठीमागे हेतू होता, आनंदवनभूवन निर्माण व्हाव. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाने हे आनंदवनभूवन निर्माण झाल. आणि मग समर्थांना अस वाटल कि आतां आपण सुखाने देह ठेवावा.

उर्वरित भाग पुढे पाहूया ...
क्रमश:

॥ श्रीराम समर्थ ॥

 सौजन्य : समर्थांची काव्यसृष्टी, सुनील चिंचोळकर.