Monday, March 21, 2011

एक कटाक्ष या गोष्टीकडे ....भाग - २


!! श्रीराम समर्थ !!

अयोध्या, मथुरा, वृंदावन, कशी इ. ठिकाणी मठस्थापना करीत असता, काशी येथील मठात समर्थांना पहाटे स्वप्न पडले. स्वप्नात त्यांनी पाहिले की, महाराष्ट्रात मराठ्यांचा राजा सिंहासनावरती बसला असून वेदमंत्र - घोषासह त्याला राज्याभिषेक होतो आहे. ते जागे झाले, ते शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने. त्यांना एकदम शहाजी महाराजांच्या भेटीची आठवण झाली. महाराष्ट्र हे आपले कार्यक्षेत्र आहे हे त्याच वेळी समर्थांनी निश्चित केले. आसामला, सिमल्याजवळ आणि राजस्थानात जयपूरला त्यांनी मठस्थापना केली. आचार्य गोपालदास यांना जयपूर मठाचे मठपती नेमून आपल्या चरण-पादुका प्रसाद म्हणून दिल्या. आजदेखील जयपूरमधील हा मठ क्रियाशील असून आचार्य धर्मेंद्र हे विद्यमान मठपती कट्टर हिंदुत्ववादी आहेत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासमवेत तुरुंगात असलेले देशभक्त रामचंद्रवीर हे आचार्य धर्मेंद्र यांचे वडिल, मोठे क्रांतिकारक होते. अशा प्रकारे राष्ट्रवादाचे बीजारोपण समर्थांनी आपल्या भ्रमणातच केले होते. 

त्यांचे अंत:करण मात्र तीळ तीळ तुटत होते. ते ब्राह्मणसमाजाची दैना पाहून दु:खी झाले. ही दयनीय अवस्था त्यांनी आपल्या वागण्यानेच करुन घेतली होती. ते जेव्हा दिल्लीला गेले तेव्हा - ‘ राजा हा विष्णूचा अंशावतार आहे ’ या श्रध्देने अनेक ब्राह्मण यमुनेत स्नान करुन ओलेत्याने बादशहाचे दर्शन घेण्यास जात. ते काशीला होते तेव्हा विश्वेश्वराच्या मंदिरातील पुजारी बादशहाची प्रकृती चांगली रहावी आणि त्यास उदंड राज्यसंपदा लाभावी म्हणून शंकराच्या पिंडीवर संकल्प सोडत होते. अत्यंत शूर असलेले रजपूत आणि मराठे सरदार आपापसांत लढाया करुन परस्पर संघर्षाला खतपाणी घालत होते. समर्थांनी लिहून ठेवले आहे –

“ कळहो लागला पंडिता पंडिताला । कळहो लागला योगिया योगियाला ।
कळहो लागला तापसा तापसाला । कळहो लागला ज्ञानिया ज्ञानियाला ” 

जनी उदंड पाहीले ! कळहो करीत राहिले ! - हे होते त्या वेळेच्या भारताचे दैवदुर्विलासी चित्र. माणसांची मने मरुन गेली होती. आणि शरीरे म्हणजे जिवंत प्रेते झाली होती. असंख्य स्त्रिया भ्रष्टविल्या जात असताना कुणाचाही संताप होत नव्हता. जणू हे सारे देवाच्या इच्छेने घडत आहे अशा निर्विकारतेने लोक या घटनांकडे पहात होते. 

समर्थांना कळून चुकले की, ज्यांना दोन वेळेस पुरेसे अन्न मिळत नाही आणि पत्नी अगर मुलगी यांचे सरक्षण करता येत नाही त्या लोकांना संसार नाशिवंत आहे असे सांगणे फार मोठा नैतिक अपराध ठरेल. ज्यांच्या संसाराच्या पटावरील सार्या् सोंगट्या उदध्वस्त झाल्या आहेत त्यांना मायाब्रह्माचा उपदेश करणे ही सामाजिक गुन्हेगारी ठरेल. भाकरीची भ्रांत असताना वेदांत सांगणे धादांत खोटे आहे, हे ह्या प्रशांत पुरुषाने जाणले. लोकांच्या समोर रामकथा ठेवली पाहिजे असे त्यांना मनोमन वाटू लागले. रामाची स्त्री देखील पळवून नेली होती पण म्हणून रामाने राजकारण-संन्यास घेतला नाही. याऊलट त्याने वानरसेनेचे संघटन करुन रावणास ठार मारले. “ संघटित व्हा आणि जे तुमच्या स्त्रिया पळवून नेतात त्यांना ठार मारा ”, हा संदेश लोकांच्या समोर ठेवायचा असेल तर रामकथा ब्रह्मांड भेदून पैलाड नेली पाहिजे, हा त्यांचा ठाम निर्धार झाला. समाजाला झालेला रोग त्यांना समजला आणि त्यावर औषधही सापडले. आपापसांत संघर्ष हा हिंदू समाजाला झालेला रोग होता आणि हिंदू समाजाचे संघटन हे त्यावरील रामबाण औषध होते. म्हणून जागोजागी समर्थ मठांची निर्मिती करत आणि आपला एक पूर्णवेळ प्रचारक त्या ठिकाणी नेमत. त्या त्या प्रांतामध्ये, त्या त्या भाषेमध्ये त्यांनी काव्यरचनाही केली. तंजावर, मद्रास, रामेश्चर, मन्यारगुड्डी, कन्याकुमारी ह्या दक्षिणेकडील भागातही समर्थांनी मठस्थापना केली. 

!! जय जय रघुवीर समर्थ !!