Monday, March 21, 2011

नाम त्याचे रामराय । रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥


आपल्या मातेसाठी समर्थांनी एका अभंगाची रचना केली. पहा ...

होते वैंकुंठीचे कोनी । शिरले अयोध्याभुवनी ।
लागे कौसल्येचे स्तनी । तेचि भूत गे माये ॥

जाता कौशिक राऊळी । अवलोकिली तये काळी ।
ताटिका ते छळूनि मेली । तेचि भूत गे माये ॥

मार्गी जाता वनांतरी । पाय पडला दगडावरी ।
पाषाणाची जाली नारी । तेचि भूत गे माये ॥

जनकाचे अगंणी गेले । शिवाचे धनु भंगिले ।
वैदेही अंगे संचारले । तेचि भूत गे माये ॥

जेणे सहस्त्रार्जुन वधिला । तोहि तत्काळचि भ्याला ।
धनु देऊनि देह रक्षिला । तेचि भूत गे माये ॥

पितयाचे भाकेशी । कैकयीचे वचनासी ।
मानुनी गेले अरण्यासी । तेचि भूत गे माये ॥

चौदा संवत्सर तापसी । अखंड हिंडे वनवासी ।
सांगाते भुजंग पोसी । तेचि भूत गे माये ॥

सुग्रीवाचे पालन । वालीचे निर्दालन ।
तारी पाण्यावरी पाषाण । तेचि भूत गे माये ॥

रक्षी भक्त बिभीषण । मारी रावण कुंभकर्ण ।
तोडी अमरांचे बंधन । तेचि भूत गे माये ॥

सर्वां भूतांचे हृदय । नाम त्याचे रामराय ।
रामदास नित्य गाय । तेचि भूत गे माये ॥


॥ जय जय रघुवीर समर्थ ॥