Sunday, March 20, 2011

एक कटाक्ष या गोष्टीकडे - भाग १ ....



नारायण सूर्याजीपंत ठोसर (रामदास) हे नाशिक टाकळी  येथे १२ वर्षे घोर तपश्चर्या करत होते. त्याच काळात त्यांनी चालविलेल्या घोर तपश्चर्येची गावकर्‍यांना प्रारंभी कल्पना येईना. विविध ग्रथांचा अभ्यास करुन त्यांनी चालविलेली वाडःमयसाधना कुणाच्याच ध्याना येईना. स्वत:ची जाहिरात करणे हे रामदासांच्या स्वभावात नव्हते. पण रामरायाला कणव आली आणि त्यांनी एक अद्भुद नाट्य घडविले.

टाकळीपासून तीन कोसावर दसपंचक नावाचे चिमुकले गाव. त्या गावातील गिरीधरपंथ कुलकर्णी नामक गृहस्थ मरण पावले. खरेतर गिरीधरपंथ जिवंतच होते. पण त्या खेडेगावात चांगला गृहस्थ वैद्य असणार कोढून ? कुणीतरी अर्ध्या हळकुंडाने पिवळा झालेल्या वैद्याने गिरीधरपंथ गेल्याचे सांगितले. त्याचे नाडीपरीक्षेचे ज्ञान म्हणजे वासरांत लंगडी गाय शहाणी ठरते, तसेच. पण त्यामुळे कुलकर्णी कुटुंबात एकाच कोकाहाल माजला. ते प्रेत दहन करण्यासाठी टाकळीस आणले. खरे तर प्रसंग खूप गंभीर होता. पण गावातल्या काही वात्रट मंडळींनी कुलकर्णी कुटुंबातल्या माणसांना मुद्दाम रामदासांकडे पाठवले  "आमच्या गावात एक बालयोगी आहेत पगा.लई तासंनतास ध्यान लावत्याती. अवं  त्याची क्रिपाद्रीष्टी पडायचा आकाश, की ह्यो मेला माणूस उठून बसलाच पगा. "  कुलकर्णी कुटुंबातल्या माणसाची माणसांची मन:स्थिती विलक्षण हळवी झाली होती. त्यांना जरा आशा वाटली. त्यांनी रामदासांना त्या ठिकाणी बोलावून  आणिले. रामदास त्या प्रेताजवळ आले. त्यांचे आरोग्यशास्त्राचे ज्ञान अफाट होते, आणि योगसाधनेचा अभ्यास असल्यामुळे नाडीपरीक्षा उत्तम होती. त्यांनी गिरीधरपंतांच्या नाडीचे ठोके टिपलेमात्र, आणि ते आश्चर्याने म्हणाले ----- " तुम्ही लोक वेडे की खुळे ? कुणा पामराने पंत गेल्याचे सांगितले ? अहो ! नाडी चालू आहे. जरा सूत आणा पाहू. ! "

गिरीधरपंतांच्या पत्नीने आपल्या साडीचेच सूत तोडले आणि समर्थांच्या हाती दिले. समर्थांनी ते गिरीधरपंतांच्या नाकपुडीजवळ धरले. गिरीधरपंतांच्या श्वासाने सूत किंचित हालले, आणि भोवतालच्या आक्रोशाचे एकदम आनंदात रुपांतर झाले. प्रेताच्या दोर्‍या सोडण्यात आल्या.

समर्थ म्हणाले, " नाशकात चांगल्या वैद्याला दाखवा. औषधोपचार करा. यास काहीही झालेले नाही. हा दीर्घ काळ जगेल. "

गिरीधरपंत वाचले. त्यांच्या पत्नी अन्नपूर्णाबाई यांना समर्थांबद्दल अत्यंत कृतज्ञता वाटली. त्यांनी आपला पहिला पुत्र रामदासांच्या चरणी अर्पिला. स्वत: समर्थांनी त्यांचे नाव " उद्धव " असे ठेविले. मात्र पोर मोठे होईपर्यंत सांभाळण्यासाठी पुन: अन्नपूर्णाबाईंकडे दिले.

या घटनेमुळे समर्थांचे निंदक समर्थांना वंदू लागले. इतके  दिवस दुरून त्यांना चिडवणारी पोरे त्यांच्या जवळ जाऊ लागली. समर्थांनी लिहून काढलेली रामायणाची पोथी, विवध उपनिषदे, भगवद्गीता, ब्रह्मसुत्र हे सारे पाहून मंडळी स्तिमित झाली. इतके दिवस गोसाव्यास आपण वृथा गांजले याचा त्यांना मनस्ताप झाला. लोक त्यांना समर्थ म्हणू लागले. पण ते मात्र रामरायाला समर्थ म्हणत आणि स्वत:ला रामाचा दास म्हण्वून घेत.

सज्जन हो, श्री समर्थ रामदास म्हणजेच श्रीराम समर्थ आहेतच, त्या समर्थाचा मी दास आहे.

!! जय जय रघुवीर समर्थ !!